राज्यातील १२ जिल्ह्यांमध्ये अद्यापही ५० टक्क्यांपेक्षा कमी पीक कर्ज वाटप : बाळासाहेब पाटील

By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2020 07:33 PM2020-08-06T19:33:50+5:302020-08-06T19:38:09+5:30

आपापल्या जिल्ह्याचे पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट वेळेत साध्य करण्याचे नियोजन करावे...

Crop loan distribution still less than 50% in 12 districts of the state: Balasaheb Patil | राज्यातील १२ जिल्ह्यांमध्ये अद्यापही ५० टक्क्यांपेक्षा कमी पीक कर्ज वाटप : बाळासाहेब पाटील

राज्यातील १२ जिल्ह्यांमध्ये अद्यापही ५० टक्क्यांपेक्षा कमी पीक कर्ज वाटप : बाळासाहेब पाटील

Next
ठळक मुद्देराज्यातील खरीप पीक कर्ज वाटपाचा सहकार मंत्र्यांनी घेतला आढावा

पुणे : शासनाने वारंवार सांगून देखील राज्यातील 12 जिल्ह्यात अद्यापही सरासरी 50 टक्क्यांपेक्षा कमी खरीप पीक कर्ज वाटप केले आहे. महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेचा लाभ देण्यात आलेल्या शेतकऱ्यांना प्राधान्याने पीक कर्ज वाटप करावे, अशा सूचना देऊन कर्जमाफीचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करण्यात हलगर्जीपणा करणाऱ्या तसेच मंजुर पीक कर्ज कमी प्रमाणात वाटप करणाऱ्या बँकांवर कारवाई करा, असे निर्देश सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी येथे दिले.
सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व सहकार राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. बैठकीला सहकार आयुक्त अनिल कवडे, अपर आयुक्त डॉ. आनंद जोगदंड, राज्यस्तरीय बँकर्स समितीचे समन्वयक बाळासाहेब तावरे तसेच संबंधित जिल्हाधिकारी, सहकार विभागाचे क्षेत्रिय अधिकारी व बँकांचे अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत नांदेड, उस्मानाबाद, परभणी, हिंगोली, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, अमरावती, बुलढाणा, वाशिम व वर्धा या कमी कर्जवाटप झालेल्या जिल्ह्यांच्या खरीप पीक कर्ज वाटपाचा सहकार मंत्री पाटील व राज्यमंत्री डॉ.कदम यांनी आढावा घेतला. सहकार मंत्री पाटील म्हणाले, सरासरी पेक्षा कमी पीक कर्ज वाटप झालेल्या जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकारी यांनी बँकांचा गावनिहाय व बँक शाखानिहाय वेळोवेळी आढावा घेऊन आपापल्या जिल्ह्याचे पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट वेळेत साध्य करण्याचे नियोजन करावे. बँकांना शाखानिहाय प्राप्त कर्जमाफीची रक्कम व संबंधित लाभार्थ्यांना पीक कर्ज वाटपाची गावनिहाय वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी स्वतंत्र अधिकाऱ्याची नियुक्ती करुन बँकांच्या कामकाजाचा आढावा घ्यावा. याबाबतचा अहवाल सहकार विभागाला सादर करा, असे निर्देश पाटील यांनी दिले.
खरीप हंगामात शेतकऱ्यांना वेळेत व पुरेसा कर्जपुरवठा होणे आवश्यक असून सहकार विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार बँकांनी कर्ज वाटपाची कार्यवाही करावी. तसेच पीक कर्ज घेण्यास इच्छुक, पात्र शेतकरी तसेच कर्जमाफी योजनेचे लाभार्थी शेतकरी पीक कर्जापासून वंचित राहणार नाहीत, याची दक्षता घ्यावी, अशा सूचना सहकार मंत्री पाटील यांनी बँक अधिकाऱ्यांना केल्या.
-----

कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांकडून बँकांनी व्याजाची रक्कम वसूल करु नये - राज्यमंत्री विश्वजित कदम यांचे निर्देश 
शेतकऱ्यांना पिकांचे उत्पादन घेण्यासाठी तसेच शेती सुधारण्यासाठी बँकांकडून वेळेत कर्जपुरवठा होणे गरजेचे आहे. कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांकडून बँकांनी ऑक्टोंबर 2019 पासून कर्जमाफीची रक्कम मिळालेल्या तारखेपर्यंत व्याजाची रक्कम वसूल करु नये, यासाठी सहकार विभागाने बँकांना स्पष्ट निर्देश द्यावेत, अशा सूचना सहकार राज्यमंत्री डॉ.विश्वजित कदम यांनी दिल्या. तसेच सहकार विभागाच्या व बँकांच्या अडचणी सहकार मंत्र्यांसोबत चर्चा करुन लवकरच सोडवण्यात येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
-----

Web Title: Crop loan distribution still less than 50% in 12 districts of the state: Balasaheb Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.