एक लाख हेक्टरवरील पिकांची माती, सर्वाधिक नुकसान नाशिक, बुलढाण्यात; ६ जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2023 07:27 AM2023-11-29T07:27:44+5:302023-11-29T07:27:58+5:30

Unseasonal rain in Maharashtra: राज्यात मागील दोन दिवस झालेल्या अवकाळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे १६ जिल्ह्यांतील अंदाजे १ लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे.

Crop loss over one lakh hectares, worst loss in Nashik, Buldhana; 6 people died | एक लाख हेक्टरवरील पिकांची माती, सर्वाधिक नुकसान नाशिक, बुलढाण्यात; ६ जणांचा मृत्यू

एक लाख हेक्टरवरील पिकांची माती, सर्वाधिक नुकसान नाशिक, बुलढाण्यात; ६ जणांचा मृत्यू

मुंबई : राज्यात मागील दोन दिवस झालेल्या अवकाळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे १६ जिल्ह्यांतील अंदाजे १ लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. बुलढाणा आणि नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान झाले आहे. हा आकडा आणखी वाढण्याची चिन्हे आहेत. या नैसर्गिक आपत्तीत सहाजणांनी आपला जीव गमावला असून, १६१ जनावरे दगावली आहेत. 

कापूस, कांदा, द्राक्ष, केळी, मोसंबी, डाळिंब, काढणीस आलेला भात, ज्वारी, गहू, हरभरा यांसह भाजीपाला आदी पिकांचे नुकसान झाले आहे. कृषी, मदत व पुनर्वसन आणि महसूल विभागाच्या वतीने झालेल्या नुकसानीची वस्तुनिष्ठ माहिती संकलित करण्याचे काम सुरू आहे. जिथे शेतकऱ्यांचे नुकसान झाले असेल तिथे मदत करण्यासाठी शेतकऱ्यांच्या खंबीरपणे पाठीशी उभे राहण्याची शासनाची भूमिका असल्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले.

राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक : सरकार काय देणार?
राज्य मंत्रिमंडळाची बैठक बुधवारी होत असून तीत अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची चर्चा होणार आहे. शेतकऱ्यांना मदत जाहीर करणार का, या बाबत उत्सुकता आहे. नेमके किती नुकसान झाले याची माहिती प्रशासनाकडून मंत्रिमंडळ बैठकीत दिली जाणार आहे. 
शेतकऱ्यांची आजची स्थिती पाहता नियम, अटी, पंचनामे या कामात वेळ न घालवता तातडीने मदत देण्याची गरज आहे. कोरडवाहू शेतीसाठी एकरी २५ हजार रुपये व बागायती शेतीच्या नुकसानीपोटी एकरी ५० हजार रुपयांची मदत तत्काळ द्यावी, अशी मागणी काँग्रेसने केली.

 

Web Title: Crop loss over one lakh hectares, worst loss in Nashik, Buldhana; 6 people died

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.