कृषी विभागाच्या क्रॉपसॅप प्रकल्पास पुरस्कार
By admin | Published: April 27, 2015 04:05 AM2015-04-27T04:05:50+5:302015-04-27T04:05:50+5:30
कृषी क्षेत्रात माहिती व संपर्क तंत्रज्ञानाच्या प्रभावी वापराबाबत राज्य शासनाच्या कृषी विभागातील क्रॉपसॅप प्रकल्पास २०११-१२च्या राष्ट्रीय स्तरावरील
मुंबई : कृषी क्षेत्रात माहिती व संपर्क तंत्रज्ञानाच्या प्रभावी वापराबाबत राज्य शासनाच्या कृषी विभागातील क्रॉपसॅप प्रकल्पास २०११-१२च्या राष्ट्रीय स्तरावरील ई-गव्हर्नन्स स्पर्धेत ‘एक्झम्प्लरी रियूज आॅफ आयसीटी बेस्ड सोल्युशन’ या सदराखाली सुवर्ण पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले. दिल्ली येथे नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते तत्कालीन कृषी आयुक्त आणि जलसंधारण विभागाचे विद्यमान सचिव प्रभाकर देशमुख यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
प्रकल्पांतर्गत देशात प्रथमच कृषी क्षेत्रासाठी माहिती व संपर्क तंत्रज्ञानाचा व्यापक प्रमाणात वापर करण्यात आला आहे. प्रतिवर्षी सर्वसाधारण ११५ ते १२० लाख हेक्टर क्षेत्रावर हा प्रकल्प राबविण्यात येतो. प्रकल्पासाठी खर्च होणाऱ्या निधीचा विचार केल्यास प्रति हेक्टरी १० रुपयांपेक्षा कमी खर्चात कीड रोगांपासून शास्त्रोक्त पद्धतीने पीक संरक्षण करणे शक्य झाले आहे. हवामानाच्या विपरीत परिस्थितीतही प्रकल्पाच्या अंमलबजावणीपासून राज्यात प्रमुख पिकांवर कोणत्याही कीड किंवा रोगाचा उद्रेक झालेला नाही. प्रकल्पांतर्गत एसएमएस सेवेसाठी नोंदणीकृत शेतकऱ्यांची संख्या २००९-१०मध्ये १.६३ लाख होती. त्यात वाढ होऊन २०१४-१५मध्ये ती १५ लाखांवर पोहोचली आहे.
केंद्राने इतर राज्यांना या प्रकल्पाचे अनुकरण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्या अनुषंगाने गुजरात व ओरिसा राज्यांनी त्याची पुनरावृत्ती केली आहे. पश्चिम बंगाल व त्रिपुरा राज्यांत लवकरच प्रकल्पाची अंमलबजावणी अपेक्षित आहे. क्रॉपसॅप प्रकल्पाची ख्याती देशाबाहेरही पोहोचली असून, राष्ट्रीय एकात्मिक कीड व्यवस्थापन केंद्राने दक्षिण अफ्रिकेत क्रॉपसॅप प्रकल्पाच्या धर्तीवर कीड रोग सर्वेक्षणाचा
प्रकल्प राबविण्यास सुरुवात केली आहे. (प्रतिनिधी)