बँकांची सव्वा कोटींनी फसवणूक
By Admin | Published: July 28, 2016 07:41 PM2016-07-28T19:41:16+5:302016-07-28T19:41:16+5:30
शहरातील दोन बँकांची सुमारे सव्वा कोटी रुपयांनी फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी शहर कोतवाली पोलिसांनी नऊ आरोपींविरुध्द गुन्हा दाखल केला आहे
ऑनलाइन लोकमत
अमरावती, दि. २८ : शहरातील दोन बँकांची सुमारे सव्वा कोटी रुपयांनी फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी शहर कोतवाली पोलिसांनी नऊ आरोपींविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. शाम चौकातील बँक आॅफ बडोदा आणि आंध्रा बँकेच्या स्थानिक शाखेला हा फटका बसला.
आंध्रा बँकेला सुमारे ९८ लाख रुपयांनी फसविण्यात आले. आकाश शिरभाते (विलासनगर, अमरावती), दि. प्रोडन्स ट्रेडिंग कंपनी कन्नमवारनगर ,वर्धा रोड ,नागपूर व अन्य एका महिलेने आंध्रा बँकेत खोटी कागदपत्रे सादर केली. ती कागदपत्रे खरी असल्याची बतावणी करून बँकेकडून ९८ लाख रूपयांचे कर्ज घेतले.
कर्जाची परतफेड न करता आंध्रा बँकेची फसवणूक केली. सर्च रिपोर्टमध्ये हा प्रकार उघड झाला. प्रतिज्ञापत्र व इतर कागदपत्रे खोटी असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर आंध्रा बँकेच्या व्यवस्थापकांनी शहर कोतवाली पोलीस ठाणे गाठले. २६ फेबु्रवारी २०१४ पूर्वी हा प्रकार घडल्याचे तक्रारीत नमूद आहे. शाखा व्यवस्थापक पी.फनी यांच्या तक्रारीवरुन शहर कोतवाली पोलिसांनी आरोपीविरुध्द नोंदविला आहे.
याशिवाय शाम चौकातील बँक आॅफ बडोदा या शाखेची २१ लाख ४० हजारांनी फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी प्रदीप नामदेवराव कळसकर, नितीन नामदेवराव कळसकर, पुरुषोत्तमनगर ,नरेंद्र देवीदासराव नलगे (रा.स्वावलंबीनगर) आणि अन्य दोन महिलांविरुध्द शहर कोतवाली पोलिसांनी कलम ४२०, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. आंध्रा बँकेकडे गहाण ठेवलेली मालमत्ता पुन्हा तारण ठेवण्यात आली. २५ जानेवारी २०१३ रोजी हा प्रकार घडला होता. याप्रकरणी शाखा व्यवस्थापक तेजसिंग श्रीरंगीलाल मिना यांनी तक्रार नोंदविली.