शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली कोटींची फसवणूक
By admin | Published: September 7, 2016 05:33 AM2016-09-07T05:33:45+5:302016-09-07T05:52:45+5:30
शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली नागरिकांना कोटयावधीला फसवणाऱ्या ठगाच्या दादर पोलिसांनी मुसक्या आवळल्या. विकास मुरलीधर तलवणेकर (४६) असे अटक आरोपीचे नाव आहे.
मुंबई : शेअर टे्रडिंगच्या नावाखाली नागरिकांना कोट्यवधीला फसवणाऱ्या ठगाच्या दादर पोलिसांनी मुसक्या आवळल्या. विकास मुरलीधर तलवणेकर (४६) असे अटक आरोपीचे नाव आहे.
विकासने कुबेर एंटरप्रायजेस नावे दादर येथील गोखले रोड परिसरात कार्यालय थाटले. गुंतवणूकदारांना तो गुंतवणूक केलेल्या रक्कमेवर ३ टक्के व्याज देण्याचे आमिष दाखवत असे. सुरुवातीला विश्वास संपादन करण्यासाठी त्याने व्याजाची रक्कमही देऊ केली. गुंतवणुकीची रक्कम वाढल्याने, त्याने पैसे देण्यास टाळाटाळ सुरू केली. त्यानंतर, विकाससोबत संपर्क तुटल्याने गुंतवणूकदारांनी जून महिन्यात दादर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. यामध्ये तब्बल १ कोटी २० लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली होती. या प्रकरणी दादर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक शांतीलाल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय दीपाली कुलकर्णी, एएसआय खांबकर, अंमलदार राठोड, पाटणे, तांबकर, ठाकूर या पथकाने शोध सुरू केला.
तपासामध्ये विकास अर्नाळा येथे असल्याची माहिती कुलकर्णी यांच्या तपास पथकाला मिळाली. त्यानुसार, सापळा रचून त्याला अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्याला ८ सप्टेंबरपर्यंतची पोलीस कोठडी सुनावली आहे. (प्रतिनिधी)