साहित्य संमेलनाचा खर्च पावणेतीन कोटी
By admin | Published: March 20, 2017 03:41 AM2017-03-20T03:41:25+5:302017-03-20T03:41:25+5:30
फेब्रुवारी महिन्यात डोंबिवलीत पार पडलेल्या ९०व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा खर्च दोन कोटी ७२ लाखांवर
डोंबिवली (ठाणे) : फेब्रुवारी महिन्यात डोंबिवलीत पार पडलेल्या ९०व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा खर्च दोन कोटी ७२ लाखांवर गेल्याचे रविवारी अधिकृतपणे स्पष्ट झाले. साहित्यिक आणि कलाकारांचे मानधन, त्यांची निवासव्यवस्था यावरच २० लाख रुपये खर्च झाले आहेत.
या संमेलनासाठी विविध माध्यमातून दोन कोटी ७८ लाखांचा निधी जमा होणार आहे. तो मिळाला, तर संमेलनाच्या खात्यात पाच लाख ९६ हजार शिल्लक राहतील, असा अंदाज आहे. हा खर्च ३१ मार्चला साहित्य महामंडळाला सादर केला जाईल, अशी माहिती स्वागताध्यक्ष गुलाब वझे यांनी दिली. (प्रतिनिधी)
अद्याप निधी येणे बाकी-
साहित्य संमेलनासाठी महापालिकेने ५० लाख रुपयांचा निधी देण्याचे कबूल केले होते. त्यापैकी २५ लाखांचा धनादेश महापालिकेने पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आयोजक आगरी यूथ फोरमला दिला होता.
उर्वरित २५ लाखांचा निधी अद्याप पालिकेकडून येणे बाकी आहे. त्याचबरोबर आमदारांकडून ५० लाखांचा निधी तर, बँक आॅफ महाराष्ट्रकडून तीन लाख रुपयांचा निधी येणे बाकी आहे. ते पाहता फोरमला ७८ लाख रुपये अजून मिळालेले नाहीत. ते लवकर मिळतील, असा विश्वास वझे यांनी व्यक्त केला.