रेल्वे तिकिटांच्या काळ्याबाजारात कोट्यवधीची उलाढाल

By admin | Published: May 29, 2015 10:37 PM2015-05-29T22:37:40+5:302015-05-30T00:35:16+5:30

एजंट मोकाट : रेल्वे सुरक्षा यंत्रणांकडून कारवाईचा फार्स; सामान्य प्रवाशांचे हाल सुरूच

Crores of turnover in black ticket booking | रेल्वे तिकिटांच्या काळ्याबाजारात कोट्यवधीची उलाढाल

रेल्वे तिकिटांच्या काळ्याबाजारात कोट्यवधीची उलाढाल

Next

मिरज : रेल्वेच्या आरक्षित तिकिटांच्या काळ्याबाजारात कोट्यवधीची उलाढाल सुरू आहे. सांगली, मिरज व कोल्हापूर स्थानकात शेकडो अनधिकृत तिकीट एजंट कार्यरत असताना, गेल्या वर्षभरात केवळ तीनच तिकीट एजंटांवर कारवाई झाली आहे. केवळ कारवाईचा फार्स करण्यात येत असल्याने तिकीट एजंटांना कारवाईची भीतीच राहिलेली नाही.
रेल्वे सुरक्षा दलाने इचलकरंजीतील एका तिकीट एजंटास अटक केली. इचलकरंजीत तिकीट एजंटांची संख्या मोठी असून गेल्या वर्षभरात केवळ तिघांवरच कारवाई झाली आहे. मध्य रेल्वेच्या पुणे विभागातच सुमारे पाचशे तिकीट एजंट कार्यरत आहेत. आरक्षित तिकिटांच्या काळ्याबाजारात दररोज कोट्यवधी रुपयांची उलाढाल सुरू असतानाही, या प्रकारास प्रतिबंध करणे रेल्वे प्रशासनाला शक्य झालेले नाही. उन्हाळी सुट्टीच्या हंगामात आरक्षित रेल्वे तिकिटांना मोठी मागणी असल्याने सर्वच रेल्वे स्थानकांवरील तिकीट खिडक्यांवर अनधिकृत तिकीट एजंटांचा ताबा आहे. छोटी स्थानके व मोठ्या स्थानकांवरील आरक्षण केंद्राच्या तिकीट खिडक्या एजंटांनी वाटून घेतल्या आहेत. कोणत्या दिवशी कोणाचा तिकीट खिडकीवर पहिला क्रमांक, हे सुध्दा ठरलेले आहे. आरक्षित तिकिटांचा काळाबाजार रोखण्यासाठी गेल्या काही वर्षात रेल्वे प्रशासनाने केलेल्या अनेक उपाययोजना निष्फळ ठरल्या आहेत. आरक्षित तिकिटांचा काळाबाजार थांबविण्यासाठी पाच वर्षापूर्वी तात्काळ तिकीट आरक्षण सुुरु करण्यात आले. जादा आरक्षण शुल्काची आकारणी करुन उपलब्ध होणाऱ्या तात्काळ तिकिटांमुळे रेल्वेच्या उत्पन्नात वाढ होऊन प्रवाशांचीही सोय झाली. मात्र तात्काळ तिकीट विक्री व्यवस्थेचा तिकीट एजंटांनी मोठा फायदा घेतला आहे. गर्दी असलेल्या रेल्वे गाड्यांची तात्काळ तिकिटे हजार ते दीड हजार रुपये जादा दराने विक्री करण्यात येत आहेत. काळाबाजार रोखण्यासाठी दोन दिवस उपलब्ध होणारी तात्काळ तिकिटे एक दिवस अगोदर देण्यात येत आहेत. तात्काळ तिकिटांसाठी स्वतंत्र रांगेसह ओळखपत्राची सक्ती, सकाळी दहाची तिकीट वाटपाची वेळ अशा उपाययोजना करण्यात आल्या. स्वत:चे तिकीट स्वत: काढणाऱ्या प्रवाशांसाठी स्वतंत्र रांगेची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र तरीही सामान्य प्रवाशांना तात्काळ तिकिटे मिळत नाहीत. रेल्वे स्थानकात आरक्षण खिडकीवर रात्रभर मुक्काम करुन तिकिटे मिळविणारे एजंट सामान्य प्रवाशांची डाळ शिजू देत नाहीत. रेल्वे आरक्षण केंद्रातील कर्मचारीही तिकीट एजंटांना सामील असल्याने, रेल्वे तिकीट काळ्याबाजाराचा व्यवसाय तेजीत आहे. (वार्ताहर)


सारेच सामील!
रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्यांवर कारवाईचे अधिकार रेल्वे सुरक्षा दलाला आहेत. मात्र रेल्वे पोलीसही एजंटांकडून वसुली करतात. आरक्षण केंद्रातील कर्मचारी, वाणिज्य निरीक्षक, वाणिज्य अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांनाच तिकीट एजंटांकडून मॅनेज करण्यात येते. इचलकरंजीतील अग्रवाल नामक एकाच एजंटाकडे शेकडो आरक्षित तिकिटे सापडली. मात्र ४६ तिकिटे जप्त करून दक्षता पथकाने उर्वरित तिकिटांच्या रकमेवर हात मारल्याची चर्चा सुुरु आहे.


वर्ष पकडलेले एजंट
२०१२ ६
२०१३ ५
२०१४ ६
२०१५३

तिकिटांचा काळाबाजार रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजना अपुऱ्या आहेत. रेल्वेची यंत्रणाच अनधिकृत एजंटांना सामील आहे. रेल्वे कर्मचारी जोपर्यंत एजंटांना सहकार्य करणे बंद करणार नाहीत, तोपर्यंत सामान्यांना तिकिटे मिळणे अशक्य आहे.
- सुकुमार पाटील, रेल्वे प्रवासी कृती समिती

Web Title: Crores of turnover in black ticket booking

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.