पुणे बंगळुरू हायवेवर खासगी वाहनात सापडली कोट्यवधीची रोकड; सत्ताधारी आमदाराकडे बोट?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2024 12:03 AM2024-10-22T00:03:52+5:302024-10-22T00:05:07+5:30
राजगड पोलिसांनी सापळा रचून मोठ्या शिताफीने पुण्याहून सातारच्या दिशेने चाललेल्या इनोवा क्रिस्टा गाडी नंबर MH 45 AS 2526 पकडून तपासणी केली.
पुणे - विधानसभा निवडणुकीच्या काळात निवडणूक आयोगाचं भरारी पथक विविध चेकपोस्टवर वाहनांची तपासणी करत असते. त्यात खेड शिवापूर टोल नाक्याजवळ एका खासगी वाहनात कोट्यवधीची रोकड सापडल्याचं उघड झालं आहे. ही रक्कम सांगोला इथं नेण्यात येत होती. सध्या पोलीस आणि निवडणूक आयोगाचे अधिकारी हे या प्रकाराचा तपास करत आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात सापडलेल्या रोकडमुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.
पुणे सातारा महामार्गावर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. खेड शिवापूर टोल नाक्याजवळ एका वाहनात कोट्यवधीची रोकड जप्त करण्यात आली. ही रक्कम जवळपास ५ कोटींपर्यंत असण्याचा अंदाज आहे. पुणे सातारा महामार्गावरील रोख रक्कम घेऊन जाणार असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. सोमवारी दुपारपासून पोलिसांनी खेड शिवापूर टोल नाक्याजवळ नाकाबंदी केली होती. त्यानंतर रात्रीच्या सुमारास एक संशयित वाहन पोलिसांना आढळले. पोलिसांनी हे वाहन रोखून त्यात तपासणी केली असता त्यात मोठ्या प्रमाणात रोकड सापडली. सध्या खेड शिवापूरच्या राजगड पोलीस ठाण्यात अधिक तपास सुरू आहे.
महाराष्ट्र मध्ये होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजगड पोलिसांकडून करण्यात आलेली ही मोठी कारवाई असून या रोख रकमे संदर्भात रात्री उशिरापर्यंत पंचनामा करण्याचे काम चालू होते ही रक्कम नेमकी कोणाची व कशासाठी नेली जात होती याची पडताळणी चालू असल्याची माहिती समोर येत आहे. गाडीमधून प्रवास करणाऱ्या चार जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले असून एवढ्या मोठ्या प्रमाणावर ती रोख रक्कम निवडणूक काळामध्ये सापडल्यामुळे खेड शिवापुर परिसरामध्ये एकच खळबळ उडाली आहे.
संजय राऊतांचं सत्ताधारी आमदाराकडे बोट
या घटनेबाबत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत सांगोला येथील आमदार शहाजी पाटील यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे. त्यांनी म्हटलंय की, मिंधे टोळीतील एका आमदाराच्या गाडीत खेड शिवापूर टोल नाक्यावर १५ कोटी सापडले!
हे आमदार कोण? काय झाडी…काय डोंगर…मिंधे यांनी निवडणुकीसाठी प्रत्येक उमेदवारास ७५ कोटी पाठवले. १५ कोटीचा हा पहिला हप्ता, काय बापू..किती हे खोके? असा चिमटा राऊतांनी काढला आहे.