पितृपक्षानिमित्त गोदाकिनारी श्राध्दविधीसाठी भाविकांची गर्दी
By admin | Published: September 22, 2016 05:42 PM2016-09-22T17:42:30+5:302016-09-22T18:50:41+5:30
भाद्रपद वद्य प्रतिपदेपासून शनिवारी महालयारंभ पर्वास सुरुवात झाली असून दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणा-या गोदावरी नदी किनारी भाविकांची तर्पण तसेच श्राध्दकर्म करण्यासाठी गर्दी होत आहे.
ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. २२ : भाद्रपद वद्य प्रतिपदेपासून शनिवारी (दि. १७) महालयारंभ पर्वास सुरुवात झाली असून दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणा-या गोदावरी नदी किनारी भाविकांची तर्पण तसेच श्राध्दकर्म करण्यासाठी गर्दी होत आहे. प्रभु रामचंद्राने आपले पिता अर्थात राजा दशरथ यांचा श्राध्दविधी पंचवटीतील रामकुंड येथे केल्याने तसेच दक्षिण दिशेला पितरांचे स्थान असल्याने नाशिक या तिर्थक्षेत्री श्राध्दविधी करण्यासाठी जगभारातून भाविकांची मोठी गर्दी पहायला मिळते. श्राद्ध कर्माच्या माध्यमातून आपल्या पूर्वजांचे स्मरण करत कृपाशीर्वाद प्राप्त करण्यासाठी श्राद्ध करण्याची परंपरा आपल्या संस्कृतीत बघायला मिळते.
पितरांचे स्मरण करून श्राद्ध विधी करण्याबरोबरच तर्पणविधी, पिंडदान विधीदेखील करण्यात येत असल्याची माहिती पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. या पितृ पक्षाच्या कालावधीत आपल्या पितरांचे स्मरण करण्यासाठी पाच प्रकारचे घास बाजुला काढून ठेवण्याची प्रथा असून यात गायीसाठी ‘गोगीरास’, अथितींसाठी ‘अतिथी भाग’, कुत्र्यांसाठी ‘श्वानभाग’, कावळयांसाठी ‘काकभाग’, किटकांसाठी ‘पितंग पंतंग भाग’ यांचा समावेश होतो.
पितृपक्षातील १५ दिवसांमध्ये ज्यांना श्राद्धविधी करणे शक्य झाले नाही त्यांना कार्तिक वद्य प्रतिपदेपर्यंत (दि. १५ नोव्हेंबर) श्राद्ध विधी करता येईल. या पितृपक्षाअंतर्गत मंगळवारी (दि. २०) भरणी श्राद्ध, शुक्रवारी (दि. २३) अष्टमी श्राद्ध, मंगळवारी (दि. २७) द्वादशी श्राद्ध, तर शुक्रवारी (दि. ३०) सर्वपित्री अमावास्या या मुख्य तिथी असून ज्या पूर्वजांचे पौर्णिमेला निधन झाले त्यांच्यासाठी या दिवशी श्राद्धविधी करता येणार आहे.
ब्रह्मपुराणात उल्लेख केल्याप्रमाणे श्रद्धापूर्वक केलेले तर्पण म्हणजे श्राद्ध अशी आख्यायिका सांगण्यात आली आहे, यानुसार योग्य गोष्ट-योग्य वस्तु-योग्य ठिकाणी विधिपूर्वक पितरांना तसेच ब्राह्मणांना अर्पण करण्यासाठी हे विधी करण्यात येतात. हे श्राद्धविधी पूर्ण करण्यासाठी दर्भ, भात, जव, काळी तीळ यांना विशेष महत्त्व आहे. महालयारंभ काळात आई, वडील, काका, मामा, भाऊ, पत्नी, बहीण, आत्या, मावशी, गुरू, शिष्य, सासरे, ज्यांना पुत्र नाहीत तसेच अनंत जन्माचे बांधवांच्या स्मरणार्थ श्राद्धकर्म करण्यात येते. श्राद्धविधी करणे शक्य न झाल्यास संततीहिनता तसेच महत्त्वाच्या कामांमध्ये अडचणी आणि पितृदोषासारख्या समस्या उद्भवत असल्याचे दाखले पुराणात पहायला मिळतात.