तिकीट खिडक्यांसमोर गर्दी
By admin | Published: November 10, 2016 06:25 AM2016-11-10T06:25:44+5:302016-11-10T06:25:44+5:30
५00 आणि १000 रुपयांच्या नोटा बंद करण्याचा निर्णय केंद्र सरकारने मंगळवारी घेतला आणि त्याचा पहिला फायदा मध्य आणि पश्चिम रेल्वेला झाला
मुंबई : ५00 आणि १000 रुपयांच्या नोटा बंद करण्याचा निर्णय केंद्र सरकारने मंगळवारी घेतला आणि त्याचा पहिला फायदा मध्य आणि पश्चिम रेल्वेला झाला. अन्य कामकाजात या नोटा वापरता येणार नसल्याचे सांगतानाच मात्र, रेल्वेत ५00 व १000 रुपयांचा नोटा प्रवाशांना वापरता येऊ शकत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आणि बुधवारी मुंबई उपनगरीय स्थानकांवर या नोटा घेऊन तिकीट काढण्यासाठी प्रवाशांची एकच झुंबड उडाली. अशाप्रकारे, ५00 आणि हजार रुपयांच्या नोटा घेऊन तिकीट आणि पास काढणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिकाधिक वाढत गेल्याने, अखेर रेल्वेलाच सुट्या पैशांचा तुटवडा जाणवू लागला. त्यामुळे स्थानकांत प्रवासी आणि कर्मचारी यांच्यात वादाचे चित्र दिसू लागले. एकंदरीत या सर्व गोंधळात मात्र, पश्चिम आणि मध्य रेल्वेला चांगलाच फायदा झाला. दोन्ही मार्गांवर महिन्याचा पास सोडता, अन्य पासांत मोठी वाढ झाली आणि एका दिवसांत १ कोटी ४ लाख ८४ हजार रुपये एवढी कमाई रेल्वेने केली.
५00 आणि १000 रुपयांच्या नोटा हद्दपार होणार असल्याने आणि त्या फक्त येत्या तीन दिवसांत रेल्वेत वापरू शकत असल्याने, अनेकांनी सकाळपासून रेल्वे स्थानकांवरच धाव घेतली. अनेकांनी या नोटा घेऊन तिकीट काढण्यापेक्षा पास काढणेच पसंत केले. ज्या प्रवाशांच्या पासाची मुदत संपण्यास एक किंवा दोन दिवस होते, अशा प्रवाशांनी त्वरित रेल्वस्थानक गाठले. त्यामुळे रेल्वे स्थानकांतील तिकीट खिडक्या आणि एटीव्हीएमसमोर मोठमोठ्या रांगा लागल्या. मध्य रेल्वेवरील सीएसटी, दादर, कुर्ला, घाटकोपर, भांडुप, मुलुंड, ठाणे, डोंबिवली, कल्याण, बदलापूर, अंबरनाथ, हार्बरवरील वडाळा, जीटीबी, टिळकनगर, चेंबूर, मानखुर्द, वाशी, पनवेल, किंग्ज सर्कल तर पश्चिम रेल्वेवरील चर्चगेट, मुंबई सेन्ट्रल, दादर, वांद्रे, अंधेरी ते बोरीवलीसह नालासोपारा, मीरा रोड, भार्इंदर आणि विरार या स्थानकात प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली. तिकीट आणि पास काढण्यासाठी तर अनेकांकडून ५00 आणि हजार रुपयांच्या नोटाच समोर केल्या जात असल्याने, रेल्वे कर्मचाऱ्यांकडून प्रवाशांना नकारही देता येत नव्हता. मात्र, सकाळपासून कमी असलेले याचे प्रमाण दुपारनंतर आणखी वाढत गेल्याने, रेल्वे प्रशासनासमोर
मोठी डोकेदुखी निर्माण झाली. या नोटा घेऊन येणाऱ्या प्रवाशांना सुटे पैसे देण्यासाठी रेल्वेकडेच सुट्या पैशांचा खडखडाट जाणवू लागला. त्यामुळे कर्मचारी आणि प्रवाशांत वाद होऊ लागले. स्थानकात कोणत्याही प्रकारे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, म्हणून रेल्वे पोलिसांचे मनुष्यबळही वाढवण्यात आले होते. (प्रतिनिधी)
सुट्या पैशांची चणचण
मध्य रेल्वेला सुट्या पैशांची मोठी चणचण भासू लागली. दिवसाला ४ कोटी सुटे रुपये रेल्वेला लागतात. पुढील तीन दिवस सुट्या पैशांची चणचण भासणार असल्याने, रेल्वेने आरबीआयकडेही या संदर्भात मदत मागितली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, बँका बंद राहिल्याने रेल्वेचे मोठे वांदे झाले. हीच परिस्थिती पश्चिम रेल्वेवरही झाल्याने हा तिढा सोडवण्यासाठी रेल्वेकडून प्रयत्न केले जात आहेत.
रेल्वे बोर्डाच्या सूचना
प्रवाशांची गैरसोय होऊ नये आणि रेल्वे प्रशासनालाही मनस्ताप होता कामा नये, यासाठी विशेष सूचना रेल्वे बोर्डाकडून देण्यात आल्या. यात एटीव्हीएमची आणि खासकरून को-एटीव्हीएमची संख्या वाढवण्याभर देण्यात यावा. या सेवेत कोणताही बिघाड होता कामा नये, ५0 हजारांवरील रोखीचा व्यवहार करताना पॅन कार्डची माहिती आवश्यक इत्यादी सूचना करण्यात आल्या.
पार्सल सेवा ठप्प
रेल्वेला पार्सल सेवांमधून चांगले उत्पन्न मिळते. यातील सर्व व्यवहार रोखीनेच होतो. मात्र, ५00 आणि १000 रुपयांच्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने पार्सल सेवेवर त्याचा मोठा परिणाम झाल्याचे सूत्रांनी सांगितले.
५०० आणि १००० च्या नोटांवरील काळा पैशावर तर चाप बसणारच आहे. त्याहीपेक्षा या निर्णयामुळे देशाच्या संरक्षण सिद्धतेवर खूप मोठा सकारात्मक परिणाम होणार आहे. देशात दहशतवादी कारवाया आणि नक्षलवादी कृत्य करणाऱ्या गटांचा मात्र, पंतप्रधानांच्या या निर्णयामुळे कणाच मोडला आहे. दहशतवादी आणि नक्षलवाद्यांवर याचा थेट परिणाम झाला असून, येत्या दोन-तीन महिन्यांत त्याची प्रचिती आपल्याला बघायला मिळेल. देशाच्या संरक्षण सिद्धतेच्या दृष्टीने हा अत्यंत महत्त्वाचा आणि दूरगामी निर्णय ठरणार आहे.
- माधव भांडारी, भाजपा मुख्य प्रवक्ते
काळ्या पैशाला चाप लावण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असेल, तर आम्ही त्याचे स्वागत करतो, परंतु मोदी सरकारने सामन्यांच्या अडचणी समजून घ्यायला हव्यात. शेतकरी आणि सामान्यांकडेही ५०० आणि १००० च्या नोटा आहेत, त्यांना त्रास होणार नाही, याची काळजी घ्यायला हवी. नोटांवर बंदी आणणाऱ्या मोदी सरकारने विदेशातील ७५ लाख कोटींचा काळा पैसा भारतात कधी आणणार, प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख कधी जमा करणार, याचेही उत्तर आता द्यायला हवीत. शेवटी ही आश्वासने त्यांनीच दिली होती.
- नवाब मलिक, प्रवक्ता राष्ट्रवादी काँग्रेस
५०० आणि १००० च्या नोटा चलनातून बाद करण्याच्या मोदी सरकारच्या निर्णयामुळे सामान्यांचे नुकसानच झाले आहे. मुळात सामान्यांना दिलासा मिळावा, यासाठी योग्य ती पूर्वतयारी आणि नियोजन करण्यात आले नाही. त्याचा फटका शेतकरी, गृहिणी आणि छोट्या व्यापाऱ्यांंना बसतो आहे, तसेच बंदीतून सरकारला जे साध्य करायचे, त्यापेक्षा अर्थव्यवस्थेवर पडणारा परिणाम चिंतेचा विषय आहे. जुन्या नोटांच्या जागी ज्या नव्या नोटा येणार, त्यासाठी १५ ते २० हजार कोटींचा खर्च येणार आहे. काळ्या पैशावर कारवाई म्हणून या नोटांवर बंदी घातली असेल, तर दोन हजारच्या नव्या नोटा छापण्याचे कारण काय, याचे स्पष्टीकरणही मोदी सरकारने द्यायला हवे. - सचिन सावंत, काँग्रेस प्रवक्ते
५०० आणि १००० रुपयांच्या नोटा चलनातून हद्दपार करण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा निर्णय अत्यंत धाडसी आणि ऐतिहासिक आहे. या निर्णयामुळे दहशतवादी आणि समाजविरोधी घटकांकडून होणाऱ्या बनावट नोटांच्या वापराला चाप बसणार आहे, शिवाय काळा पैसा उघड होण्यासही या निर्णयामुळे मदत होणार आहे.
- सी. विद्यासागर राव, राज्यपाल
काळा पैसा, बनावट नोटा आणि भ्रष्टाचारासारख्या अर्थव्यवस्थेला खिळखिळ्या करणाऱ्या बाबींच्या उच्चाटनासाठी घेतलेला हा निर्णय ऐतिहासिक असा आहे. या निर्णयामुळे भ्रष्टाचाराला नक्कीच आळा बसणार आहे. या निर्णयांमुळे सामान्यांना घाबरण्याचे काहीच कारण नाही, त्यांचा पैसा सुरक्षितच आहे. या उपायांमुळे पुढील काही दिवस नागरिकांची गैरसोय होणार आहे, परंतु प्रत्येक नागरिकास देशासाठी काहीतरी करण्याची संधी क्वचितच मिळत असते. सरकारचा हा निर्णयसुद्धा अशीच एक संधी आहे. त्यासाठी राज्यातील सर्व अधिकारी-कर्मचारी कर्तव्यभावनेने सहकार्यच करतील.
- महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघ
सरकारच्या निर्णयामुळे कोणीही घाई-गडबड करण्याची अथवा घाबरून जाण्याची गरज नाही. सरकारने नोटा बदलून देण्याची व्यवस्था केली असल्याने, कोणाचाही कष्टाचा पैसा बुडणार नाही, ज्यांनी अवैध मार्गाने पैसा गोळा केला आहे, त्यांनाच या बंदीचा फटका बसणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे गेली अनेक वर्षे भ्रष्टाचाराच्या विरोधात लढणाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. अर्थक्रांतीच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन.
- श्री श्री श्री रविशंकर, आध्यात्मिक गुरु