तुळजाभवानी मातेच्या दर्शनाला गर्दी उसळली
By Admin | Published: September 30, 2014 02:20 AM2014-09-30T02:20:01+5:302014-09-30T02:20:01+5:30
महाराष्ट्राची कुलस्वामिनी असलेल्या श्री तुळजाभवानी मातेचे उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर येथे वास्तव्य असून, हे साडेतीन शक्तिपीठांपैकी एक पूर्णपीठ आहे.
>22 तास मंदिर खुले : साडेतीन शक्तिपीठांपैकी एक पूर्णपीठ
उस्मानाबाद : महाराष्ट्राची कुलस्वामिनी असलेल्या श्री तुळजाभवानी मातेचे उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर येथे वास्तव्य असून, हे साडेतीन शक्तिपीठांपैकी एक पूर्णपीठ आहे. तुळजाभवानी देवीच्या शारदीय व शाकंभरी नवरात्रौत्सवाबरोबरच चैत्र आणि आश्विन पौर्णिमा या दिवशीही मोठय़ा यात्र येथे भरतात. या कालावधीमध्ये महाराष्ट्रासह शेजारील आंध्र, कर्नाटक राज्यातून तसेच देशाच्या विविध भागांतूनही लाखो भाविक देवीच्या दर्शनासाठी येतात.
औरंगाबाद - सोलापूर महामार्गावर उस्मानाबादपासून 22 किमी अंतरावर तुळजापूर हे गाव आहे. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना भवानी तलवार देऊन हिंदवी स्वराज्य स्थापनेचा आशीर्वाद देणारी तुळजापूरची ही देवी भवानी माता महिषासूर मर्दिनी, तुकाई, रामवरदायिनी, जगदंबा आदी नावांनी ओळखली जाते. जगदंबा मातेची मूर्ती गंडकी शिळेची असून, ती अष्टभुजा आहे. तुळजाभवानीची मूर्ती चल असून, ती वर्षातून तीनवेळा सिंहासनावरून हलविली जाते. इतर कोणतीही देवता अशा रितीने सिंहासनावरून हलविण्यात येत नाही. भाद्रपद वंद्य अष्टमीला नवरात्रीपूर्वी प्रथम ही मूर्ती हलविण्यात येऊन आश्विन शुद्ध प्रतिपदेस पुन्हा स्थानापन्न करण्यात येते. दस:याला सीमोल्लंघन केल्यानंतर पुन्हा विजयादशमी ते कोजागिरी पौर्णिमेर्पयत देवीची ही मूर्ती मंचकी निद्रेत असते. तसेच पौष शुद्ध प्रतिपदेपासून पौष अष्टमीर्पयत पुन्हा ती शेजघरात निद्रिस्त असते. तुळजाभवानी मातेचा नवरात्रौत्सव कोजागिरीर्पयत चालतो. कृत युगाच्या वेळी ‘कर्दम’ ऋषींची प}ी अनुभूती हिच्याबद्दल कुनकुर नावाच्या दैत्याला अभिलाषा उत्पन्न झाली. तिच्या पातिव्रत्याचा भंग करण्याचा त्याने प्रय} करताच देवी पार्वती धावून आली. तिने दैत्याचा नाश केला. त्यामुळेच त्वरित धावून येणारी म्हणून ती ‘त्वरिता’ किंवा मराठीत ‘तुळजा’ या नावाने ही देवी ओळखली जाते.
मुरली अलंकार महापूजा.. शारदीय नवरात्रोत्सवातील पाचव्या माळेनिमित्त सोमवारी श्री तुळजाभवानी मातेची मुरली अलंकार विशेष
महापूजा मांडण्यात आली होती.
मातेच्या भगिनी : तुळजापूर नगरीत मातेच्या अनेक भगिनी अस्तित्वात असून, या मूर्तीचे अगदी पदस्पर्श करून दर्शन होत होते. या दर्शनातही तुळजाभवानी मातेच्या दर्शनाची धन्यता मानून असंख्य भाविक ‘तुळजापूर-वारी’ यशस्वी झाल्याचा आनंद व्यक्त करतात.
नवरात्रीत 22 तास दर्शन : इतर दिवशी पहाटे 5 वाजल्यापासून ते रात्री 9 वाजेर्पयत हे मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले ठेवण्यात येते. परंतु, नवरात्रौत्सव कालावधीत भाविकांची गर्दी पाहून दर्शनाची वेळ वाढविली जाते. या काळात केवळ रात्री 11 ते 1 ही वेळ वगळता इतर 22 तास हे मंदिर भाविकांना दर्शनाखाली खुले ठेवण्यात येते.
गोमुख तीर्थ : मंदिरातील गोमुखाचे पाणी भवानी मातेच्या नित्य स्नानाला वापरले जाते. या पाण्याचा काशितीर्थाशी संबंध जोडलेला आहे. त्यामुळे मंदिरात येणारा प्रत्येक भाविक या गोमुखात हात-पाय धुवून किंवा स्नान करून दर्शनासाठी जातो.