उमेदवारीसाठी ‘इच्छुकांची’ गर्दी
By admin | Published: January 18, 2017 02:45 AM2017-01-18T02:45:57+5:302017-01-18T02:45:57+5:30
मुंबई महापालिका निवडणुकांची घोषणा होताच आता उमेदवारीसाठी ‘इच्छुकांची’ही धावाधाव सुरू झाली आहे. एच ईस्ट वॉर्डमध्ये दहा प्रभाग येतात.
मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकांची घोषणा होताच आता उमेदवारीसाठी ‘इच्छुकांची’ही धावाधाव सुरू झाली आहे. एच ईस्ट वॉर्डमध्ये दहा प्रभाग येतात. या प्रभागात शिवसेनेकडून सर्वात जास्त इच्छुक उमेदवार असून त्यानंतर भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसेचा नंबर लागतो. महत्त्वाची बाब म्हणजे काही प्रभागांत ज्या राजकीय पक्षांच्या नगरसेवकांचे चांगले बस्तान असूनही त्या पक्षातूनही इच्छुक उमेदवारांची यादी मोठी आहे.
मुंबई उपनगरीय भागात एच ईस्ट वॉर्डमध्ये प्रभाग क्रमांक ८७ पासून प्रभाग क्रमांक ९६ येतो. या प्रभागांमध्ये पालिका निवडणुकीच्या उमेदवारीसाठी सध्या शिवसेनेकडून जवळपास ३0, भाजपाकडून २५, काँग्रेसकडून १७, राष्ट्रवादीकडून १३, मनसेकडून १६ पेक्षा अधिक उमेदवार इच्छुक आहेत. २0१२ साली झालेल्या पालिका निवडणुकीत एच ईस्ट वॉर्डमधील प्रभाग हे ८१ ते ९१ पर्यंत येत होते. या प्रभागांमध्ये फेरबदल होत आता ८७ ते ९६ पर्यंत प्रभाग क्रमांक येतात. २0१२ साली मनसेचे दोन, शिवसेनेचे चार, काँग्रेसचे तीन, भाजपाचा एक आणि एक अपक्ष उमेदवार विजयी झाले होते. ज्या-ज्या भागात काही नगरसेवकांनी चांगली कामे करून आपले बस्तान बसवले आहे, अशा प्रभागांतही इच्छुकांची यादी चांगलीच मोठी आहे. इच्छुकांनीही आपल्या कामांची यादी तयार करून ती पक्षाच्या वरिष्ठांपर्यंत पोहोचवण्याची तयारी केली आहे. प्रभाग क्रमांक ९0, ९२, ९३ आणि प्रभाग क्रमांक ९४ महिलांसाठी आरक्षित आहे. त्यामुळे या भागात महिला इच्छुक उमेदवारांची संख्याही लक्षणीय आहे.
या वॉर्डमध्ये शिवसेनेचे चांगलेच वर्चस्व असून त्यानंतर काँग्रेस व मनसेचा नंबर लागतो. भाजपाचा एकच उमेदवार या वॉर्डातून गेल्या पालिका निवडणुकीत निवडून आला होता. त्यामुळे भाजपाने एकला चलो रेची भूमिका घेतल्यास यंदा एच ईस्ट वॉर्डातील दहा प्रभागांत उमेदवार निवडताना शिवसेना, काँग्रेसचे मोठे आव्हान भाजपाला असेल. मनसे, सपाबरोबरच, आरपीआय, आप आणि एमआयएमकडूनही उमेदवार उभे केले जाणार असल्याने येथील लढत चांगलीच रंगतदार होईल. त्यामुळे शिवसेना, भाजपा, काँग्रेसला उमेदवार निवडून आणण्यासाठी आपली ताकद पणाला लावावी लागेल हे मात्र नक्की. (प्रतिनिधी)