झोपलेल्या सरकारला जागं करण्यासाठी हल्लाबोल मोर्चा, शरद पवार यांचा घणाघात
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2017 06:06 PM2017-12-12T18:06:56+5:302017-12-12T18:11:58+5:30
हिवाळी अधिवेशनादरम्यान मंगळवारी नागपुरात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांनी आयोजित केलेल्या हल्लाबोल मोर्चाला संबोधित करताना माजी केंद्रीय कृषिमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी सरकारच्या धोरणांवर घणाघाती टीका केली.
नागपूर - हिवाळी अधिवेशनादरम्यान मंगळवारी नागपुरात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांनी आयोजित केलेल्या हल्लाबोल मोर्चाला संबोधित करताना माजी केंद्रीय कृषिमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी सरकारच्या धोरणांवर घणाघाती टीका केली. झोपलेल्या सरकारला जागं करण्याठी आज हा हल्लाबोल मोर्चा काढावा लागल्याचे त्यांनी सांगितले. तसेच बिनकामाच्या सरकारला धडा शिकवण्यासाठी शेतकऱ्यांनी सरकारविरोधात असहकार पुकारावा, वीज बिल, कर भरू नयेत असे आवाहन त्यांनी केले.
तब्बल 37 वर्षांनंतर शरद पवार आपल्या वाढदिवसा दिवशी एखाद्या मोर्चात सहभागी झाले होते. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांनी आयोजित केलेल्या या हल्लाबोल मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणावर जनसहभाग दिसून आला होता. या मोर्चानंतर आयोजित सभेसाठी गुलाम नबी आझाद, शरद पवार यांच्यासह काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक नेते उपस्थित होते.
यावेळी उपस्थितांनी संबोधित करताना शरद पवार यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. " झोपलेल्या सरकारला जागं करण्यासाठी हा हल्लाबोल मोर्चा काढण्यात आला आहे. आज राज्यातील शेतकरी विविध समस्यांनी त्रस्त आहे. कर्जमाफीच्या नावाखाली सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. बळीराजामध्ये सरकार उलथून टाकण्याची ताकद असते. तुम्ही सरकारविरोधात असहकार पुकारा. वीज बील भरू नका. कर भरू नका," असे आवाहन शरद पवार यांनी केले.
आज तब्बल 37 वर्षांनंतर शरद पवार हे वाढदिवसादिवशी नागपूरच्या रस्त्यावर आंदोलनात उतरल्याचे पहायला मिळाले. शरद पवार यांनी 1980 मध्ये मुख्यमंत्री ए. आर. अंतुले सरकारच्याविरोधात ऐतिहासिक मोर्चा काढला होता. तेव्हा शरद पवार यांनी पुलोदचे नेतृत्व केले होते. या मोर्चाला शेतकऱ्यांनी मोठा प्रतिसाद दिला होता. सत्ताधारी भाजप-शिवसेना युती सरकारने शेतकरी आणि सामान्यांच्या विषयांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करत काँग्रेस-राष्ट्रवादीने हल्लाबोल मोर्चाचं आयोजन केलं आहे.
दरम्यान, काल हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर ‘हल्लाबोल’ केला. शेतक-यांच्या कर्जमाफीवरून गोंधळ घालणा-या विरोधकांना ठणकावताना, शेतक-यांच्या आत्महत्या हे तुमचे पाप आहे, असे त्यांनी सुनावले. विरोधकांकडे दुर्लक्ष करीत सरकारने संपूर्ण कामकाजही उरकले. विधानसभेत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी कर्जमाफीचा लाभ शेतक-यांना मिळाला नसल्याचे सांगत चर्चेची मागणी केली. ती नाकारून विधानसभाध्यक्षांनी कामकाज पुकारताच विरोधकांनी घोषणा सुरू केल्या. त्यांनी कर्जमाफी फसवी असून दीड हजार शेतक-यांनी आत्महत्या केल्याचा ठपका ठेवला. बोंडअळीमुळे नुकसान झालेल्या शेतक-यांना एकरी २५ हजार रुपये मदत देण्याची मागणी त्यांनी केली.