विज्ञान, वाणिज्य विद्याशाखेतही सेट उत्तीर्ण विद्यार्थ्यांची गर्दी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2019 11:30 PM2019-12-02T23:30:00+5:302019-12-02T23:30:02+5:30
सेट परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतरही अनेक विद्यार्थ्यांना नोकरीची प्रतीक्षा
राहुल शिंदे-
पुणे : भाषा किंवा सामाजिकशास्त्र विषयातच सेट परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे,असे नाही तर विज्ञान ,वाणिज्य, विधी, व्यवस्थापनशास्त्र आदी विद्याशाखांमधील विविध विषयांसाठी घेतलेल्या सेट परीक्षेत अनेक विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी संख्येच्या तुलनेत शिक्षकांची नियुक्ती केली जात नाही. त्यामुळे सेट परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतरही अनेक विद्यार्थ्यांना नोकरीची प्रतीक्षा करावी लागते. सर्वच विद्याशाखांमध्ये पीएच.डी. प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी असल्याने प्राध्यापक पदासाठीच्या नोकरीतील स्पर्धा चांगलीच वाढली आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे महाराष्ट्र व गोवा राज्यातील विद्यार्थ्यांची सेट परीक्षा घेतली जाते.विद्यापीठाच्या सेट विभागातर्फे ३२ विषयांची परीक्षा घेतली जाते. त्यात केमिकल सायन्स,लाईफ सायन्स, वाणिज्य या विषयांची परीक्षा देण्यासाठी १० हजारापेक्षा जास्त विद्यार्थी नोंदणी करतात.न्यायालयाच्या आदेशानुसार व युजीसीच्या निदेर्शानुसार सेट विभागातर्फे परीक्षेस प्रविष्ठ झालेल्या विद्यार्थी संख्येच्या ६ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण होतात. त्यामुळे सर्वच विषयात उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढले आहे. कॉम्प्युटर सायन्स अ?ॅण्ड अ?ॅप्लिकेशन विषय वगळता सर्व विषयांचा निकाल ५ टक्क्यांंच्या पुढे लागला आहे.
सेट परीक्षेचा २०१८ मध्ये फॉरेन्सिक सायन्स विषयाचा निकाल १७.४६ टक्के तर २०१९ मध्ये १२.३ टक्के लागला.तसेच शिक्षणशास्त्र विषयाचा निकाल २०१८ मध्ये १०.३७ टक्के आणि २०१९ मध्ये ११.१ टक्के लागला.विधी विषयाचा निकाल २०१८ मध्ये ७.४२ टक्के तर २०१९ मध्ये ७.६ टक्के लागला. सध्या बीएड्., एम.एड्. महाविद्यालयांना विद्यार्थी मिळत नाहीत. परिणामी राज्यातील बहुतांश महाविद्यालये बंद पडली आहेत. त्याचप्रमाणे राज्यातील विधी महाविद्यालयांची संख्या मर्यादित आहे. गेल्या दोन वर्षातच विधी विषयाच्या सेट परीक्षेत राज्यातील १२५ विद्यार्थी तर वाणिज्य विषयातील ९५६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या तुलनेत विधी व वाणिज्य महाविद्यालयांची संख्या वाढली नाही किंवा महाविद्यालयांमध्ये प्राध्यापकांची एवढी पदे निर्माण झाली नाहीत. त्यामुळे शिक्षण क्षेत्रातील बेरोजगारीमध्ये दरवर्षी भर पडत चालली आहे.
-------------------
सेट परीक्षेचा निकाल वाढत आहे.मात्र,त्यातुलनेत शासनाकडून प्राध्यापकांची पदे उपलब्ध करून दिली जात नाहीत. शिक्षक-विद्यार्थी प्रमाणानुसार (स्टूडेंट टिचर रेशो) महाविद्यालयांमध्ये प्राध्यापकांची पदे भरली जात नाही. पुढील पिढी घडविण्यासाठी शिक्षकांची आवश्यकता आहे. शिक्षकांकडे दूर्लक्ष केले तर देशाच्या विकासाच्या गतीला फटका बसू शकतो. तुटपुंज्या मानधनावर प्राध्यापकांची अधिक काळ नियुक्ती करणे उचित ठरणार नाही. तसेच नवीन शैक्षणिक धोरणात नेट-सेट परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्याचा विचार आहे. - डॉ.मनोहर चासकर,अधिष्ठाता ,विज्ञान व तंत्रज्ञान ,सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
.................
व्यवस्थापनशास्त्र विद्याशाखेसाठी सेट-नेट परीक्षा उत्तीर्ण होण्याची आवश्यक नाही. पीएच.डी.पदवी धारक उमेदवारांना व्यवस्थापनशास्त्र विद्याशाखेत प्राध्यापक म्हणून नियुक्ती दिली जाते. सर्व विषयाच्या प्राध्यापक पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी खूप-मोठ्या प्रक्रियेतून जावे लागते. तसेच सेट-नेट परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थी संख्येच्या तुलनेत नोक-या उपलब्ध होत नाहीत. परिणामी शिक्षण क्षेत्रातील बेरोजगारी वाढत चालली आहे. त्यामुळे सेट परीक्षेत उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांच्या संख्येबाबत पुनर्विचार करावा लागेल.
- डॉ.पराग काळकर, अधिष्ठाता,वाणिज्य व व्यवस्थापन,सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
.........................
सेट परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची आकडेवारी
-------------------------------------------
प्रविष्ठ विद्यार्थी उत्तीर्ण विद्यार्थी
--------------------------------------------------------
विषय २०१८ २०१९ २०१८ २०१९
----------------------------------------------------------------
होम सायन्स २९८ ४३४ २६ ४३
लायब्ररी सायन्स २,५५१ २,७९५ १५९ २४९
जर्नालिझम ४२३ ४२६ ३६ ४४
सोशल वर्क १,०६२ १,२८३ ९९ १६८
पब्लिक १२६ १४७ १० १८
मटेरिअल सायन्स ४,८५९ ६,२९१ २१८ २४९
पर्यावरण शास्त्र ४७६ ५४३ ३२ ४७
फिजिकल सायन्स ३,७४० ४,९२७ १९७ ३१९
केमिकल सायन्स ४,८५९ ८,४७८ २२९ ३०८
लाईफ सायन्स ६,६०० ९,०९९ ३६२ ५३७
भूगोल १,८५० २,०५४ १४४ १९३
कॉम्प्युटर सा. २,७६७ ३,५४१ १६५ १३०
एलेक्ट्रॉनिक्स सा. ३९७ ४६८ ३३ ४०
फॉरेन्सिक सायन्स ६३ ६५ ११ ०८