अप्रमाणित कंपन्यांवर गुन्हे, यवतमाळच्या विषबाधाप्रकरणी झाडाझडती : कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2017 03:52 AM2017-10-10T03:52:37+5:302017-10-10T03:53:14+5:30
कीटकनाशकांच्या फवारणीनंतर विषबाधा होऊन यवतमाळमध्ये शेतक-यांना हकनाक जीव गमवावा लागला असून, शिफारस व गरज नसतानाही घातक विषारी कीटकनाशकांची विक्री झाली.
मुंबई : कीटकनाशकांच्या फवारणीनंतर विषबाधा होऊन यवतमाळमध्ये शेतक-यांना हकनाक जीव गमवावा लागला असून, शिफारस व गरज नसतानाही घातक विषारी कीटकनाशकांची विक्री झाली. त्यामुळे कीटकनाशक कंपन्या आणि वितरकांवर अप्रमाणित रसायने विक्री प्रकरणी कायद्यानुसार फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येत असून, शासकीय यंत्रणेतील दोषींवर कारवाई केली जाईल, असे कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी सोमवारी येथे सांगितले.
शेतकरी मृत्यूच्या पार्श्वभूमीवर फुंडकर यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे बीटी बियाणे उत्पादक कंपन्या आणि कीटकनाशक कंपन्यांच्या प्रतिनिधींची स्वतंत्र बैठक घेतली. कृषिमंत्र्यांनी कंपन्यांचे प्रतिनिधी व कृषी विभागाच्या अधिकाºयांना धारेवर धरले. कंपन्यांनी केवळ नफा न कमवता शेतकºयांप्रति सामाजिक बांधिलकी दाखवावी, असे आवाहन त्यांनी केले. आपण उत्पादित केलेल्या कीटकनाशकामुळे शेतकरी, शेतमजूर रुग्णालयात दाखल होत आहेत, याची माहिती घेण्याचीही गरज भासली नाही का, असा संतप्त सवाल कृषिमंत्र्यांनी केला. फवारणीबाबत मार्गदर्शन करणेही तितकेच आवश्यक आहे, अशा शब्दांत त्यांनी कंपन्यांच्या प्रतिनिधींची कानउघाडणी
केली.
गरजेपेक्षा जास्त कीटकनाशकांची विक्री झाल्याची चौकशी करण्यात आहे. सप्टेंबरमध्ये बीटी बियाणे उत्पादक कंपन्यांबरोबर झालेल्या बैठकीत प्रत्येक तालुक्यात बियाण्यांची माहिती, वापर, फवारणीचे मार्गदर्शन करण्यासाठी प्रतिनिधी नेमणार होते, मात्र नियुक्ती झाली नाही. बियाणे कंपन्यांनी किती बैठका घेतल्या, याची माहिती शासनाला सादर करण्याचे निर्देश कृषिमंत्र्यांनी दिले.
सहाय्यता निधी वर्ग
यवतमाळ जिल्ह्यात मृत्यू पावलेल्या शेतकरी व शेतमजुरांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी २ लाख रुपयांचे अर्थसाहाय्य मुख्यमंत्री साहाय्यता निधी निधीतून मंजूर केले असून, त्यासाठी एकूण ३२ लाख रुपये जिल्हाधिकाºयांकडे वर्ग करण्यात आले आहेत, असे मुख्यमंत्री सचिवालयाने कळविले आहे.
शेतकºयांचे मृत्यू हे
बहुराष्ट्रीय कंपन्यांचे षड्यंत्र
नागपूर : कीटकनाशक फवारणीमुळे विषबाधा होऊन आतापर्यंत ४० शेतकºयांचे मृत्यू झाले आहेत. हा केवळ अपघात नव्हे, तर हे बहुराष्ट्रीय कंपन्यांचे षड्यंत्र आहे. यासाठी कीटकनाशक बनवणाºया कंपन्या, त्याची शहानिशा न करता मंजुरी देणारे सरकार आणि त्याचे प्रमाणीकरण न तपासताच त्याचा उपयोग करू देणारे अधिकारी दोषी आहेत, असा आरोप राज्य शासनाच्या वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी सोमवारी पत्रपरिषदेत केला.
कीटकनाशक कंपन्यांनी १० हजार कोटींचा व्यवसाय
केला. परंतु ही घटना झाली तेव्हा एकही अधिकारी ‘अॅण्टी डोस’चे कीट वाटायला आला नाही. मी आज सरकारमध्ये असलो तरी सातत्याने हा प्रश्न मांडत आहे. फडणवीस सरकार आम्ही केलेल्या सूचनांवर तातडीने कारवाईसुद्धा करीत असल्याचे त्यांनी सांगितले.
विनापरवाना कीटकनाशकांचा साठा अकोल्यातून जप्त!
अकोला : पश्चिम विदर्भात विनापरवाना कीटकनाशकांची विक्री केली जात असून, येथील औद्योगिक वसाहतीमधील दोन गोदामांतून विनापरवाना कीटकनाशकांचा साठा गुणनियंत्रण विभागाने जप्त केला आहे. या प्रकरणाची सुनावणी लवकरच कृषी आयुक्तांसमोर होणार आहे.
जहाल कीटकनाशकांच्या फवारणीमुळे विदर्भात ३४पेक्षा जास्त शेतकरी, शेतमजुरांचा मृत्यू झाला असून, पाचशेवर शेतकरी, शेतमजुरांना विषबाधा झाली आहे. सर्वाधिक मृत्यू यवतमाळ जिल्ह्यात झाले आहेत. अकोल्यातील औद्योगिक वसाहतीतील फेज २मध्ये माहेश्वरी बायो फ्यूएल प्लॉट क्रमाक १४ येथे मे. रेनबो क्रॉप हेल्थ लिमिटेड तसेच न्यू रवी स्पिनिंग मॅन्युफॅक्चर कंपनी
फेज २ प्लॉट नं. एफ -२२मध्ये मे. भारत इन्सेक्टिसाइड लि. गोदाम आहे. या दोन्ही ठिकाणांहून अप्रमाणित तण व कीटकनाशके बाजारात पुरविली जात होती. गुणनियंत्रण विभागाने मागील आठवड्यात येथे छापा टाकला होता.