डास मारण्यासाठी निकृष्ट औषधाची खरेदी
By Admin | Published: December 17, 2014 11:38 PM2014-12-17T23:38:05+5:302014-12-17T23:38:05+5:30
डास मारण्यासाठी नीता पॉल या कंपनीकडून पुरवठा करण्यात आलेले पायरेथ्रम एक्स्ट्रॅक्ट हे निकृष्ट दर्जाचे असल्याचे आढळून आले
नागपूर : डास मारण्यासाठी नीता पॉल या कंपनीकडून पुरवठा करण्यात आलेले पायरेथ्रम एक्स्ट्रॅक्ट हे निकृष्ट दर्जाचे असल्याचे आढळून आले असतानाही मुंबई महापालिकेने संबंधित कंत्राटदाराकडूनच पुन्हा खरेदी का केली, निकृष्ट औषधामुळे डेंग्यूचे डास मेलेच नाही व डेंग्यूची लागण होऊन १५० जणांचा मृत्यू झाला यासाठी जबाबदार कोण, असे प्रश्न विरोधकांनी विधानसभेत उपस्थित करीत मुंबई महापालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण केले. शिवसेनेची सत्ता असलेल्या मुंबई महापालिकेतील गैरप्रकाराचा मुद्दा जोरात लावून धरत विरोधकांनी शिवसेनेचेच नेते असलेले आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांची सभागृहात कोंडी केली. खरेदी घोटाळ्याच्या विरोधात नारेबाजी करीत विरोधकांनी सभात्याग केला.
शशिकांत शिंदे, छगन भुजबळ, जितेंद्र आव्हाड यांनी लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून या गैरप्रकाराकडे सरकारचे लक्ष वेधले. नीता पॉल कंपनीने एकदा पुरवठा केलेले औषध निकृष्ट दर्जाचे आढळले. त्यानंतरही संबंधित कंपनीकडूनच खरेदी का करण्यात आली, तिला ब्लॅकलिस्ट का केले नाही, असे प्रश्न उपस्थित करीत मुंबई महापालिकेच्या कार्यप्रणालीवर ताशेरे ओढले. मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीने अशा खरेदीला प्रशासकीय मंजुरी का दिली, असा प्रश्न उपस्थित करीत स्थायी समितीच्या सदस्यांवरही कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. भाजपचे आशिष शेलार यांनीही हा मुद्दा लावून धरला.
नीता पॉल ही कोलकाता येथील कंपनी आहे. कोणत्याही कंपनीला महाराष्ट्रात औषध विकायचे असेल तर महाराष्ट्र कृषी आयुक्तांची परवानगी घ्यावी लागते. मात्र, संबंधित कंपनीला अशी परवानगी देण्यात आलेली नाही. असे असतानाही या कंपनीला कंत्राट कसे देण्यात आले, असा सवाल त्यांनी केला. शेलार यांनी दिलेल्या माहितीमुळे विरोधकांना आणखी पाठबळ मिळाले. निकृष्ट औषधाची फवारणी झाल्यामुळे वर्षभरात ८० टक्के डास मेले नाहीत.
त्यामुळे नागरिकांना डेंग्यूची लागण झाली व मुंबईत १५० नागरिकांचा मृत्यू झाला, यासाठी जबाबदार कोण याचा जाब विचारत निकृष्ट औषध खरेदी करणारे मुंबई महापालिकेतील अधिकारी व संबंधित कंपनीवर गुन्हे दाखल करण्याची मागणी विरोधकांनी लावून धरली.
यावर आरोग्यमंत्री डॉ. सावंत यांनी कुणालाही पाठीशी घालणार नाही, कंत्राट देणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यावर कारवाई करू, असे आश्वासन दिले. मात्र, मंत्र्यांच्या आस्वासनानंतरही विरोधक नमले नाहीत. अध्यक्षांच्या आसनासमोर येऊन मुंबई महापालिकेच्या कारभाराविरोधात नारेबाजी सुरू केली व नंतर सभात्याग केला. (प्रतिनिधी)