पतीला कामाच्या ठिकाणी सतत फोन करणे क्रूरताच

By admin | Published: September 25, 2015 03:09 AM2015-09-25T03:09:08+5:302015-09-25T03:36:42+5:30

पतीशी सतत किरकोळ कारणांवरून भांडणे, वारंवार आत्महत्येची धमकी देणे, त्याच्या कामाच्या ठिकाणी फोन करून कामात व्यत्यय आणणे,

Cruelty to call her husband constantly at work | पतीला कामाच्या ठिकाणी सतत फोन करणे क्रूरताच

पतीला कामाच्या ठिकाणी सतत फोन करणे क्रूरताच

Next

मुंबई : पतीशी सतत किरकोळ कारणांवरून भांडणे, वारंवार आत्महत्येची धमकी देणे, त्याच्या कामाच्या ठिकाणी फोन करून कामात व्यत्यय आणणे, तसेच मित्रपरिवारात बदनामी करण्यासाठी त्याचे मेल हॅक करून अश्लील मेल पाठवणे, हे पत्नीचे वर्तन म्हणजे एक प्रकारची क्रूरताच आहे, असे निरीक्षण नोंदवत कुटुंब न्यायालयाने अवघे चार महिने एकत्र राहिलेल्या दाम्पत्याचा घटस्फोट अर्ज मंजूर केला. ३०वर्षीय पतीने पत्नीपासून घटस्फोट मिळावा, यासाठी अर्ज केला होता.
अजय मेहता (बदललेले नाव) आणि अनिषा मेहता (बदललेले नाव) यांचा विवाह ३१ मार्च २०११ रोजी झाला. मात्र चार महिन्यांतच अजयला अनिषापासून घटस्फोट घेण्यासाठी कुटुंब न्यायालयाची पायरी चढावी लागली. अजय यांच्या म्हणण्यानुसार, अनिषा लग्नाच्या पहिल्या दिवसापासून तिच्या गुरूच्या सांगण्यावरून शारीरिक संबंध ठेवण्यास नकार देत होती. विवाह होऊन चार महिले उलटले तरी या दोघांमध्ये शारीरिक संबंध आले नाहीत. किरकोळ कारणावरून अनिषा सतत भांडते आणि आत्महत्या करण्याची धमकी देते, असेही आरोप अजय यांनी त्यांच्या पत्नीविरोधात केले. मात्र अनिषा यांनी हे सगळे आरोप नाकारले. अजय अनैसर्गिक पद्धतीने शारीरिक संबंध ठेवण्याची
मागणी करत आहे आणि यासाठीच आपण शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिला, असे अनिषाने न्यायालयाला सांगितले. अनिषा घटस्फोट द्यायला
तयार आहे, मात्र तिच्या वडिलांनी लग्नासाठी आणि वैद्यकीय चाचणीसाठी केलेला खर्च लक्षात घेता तिला कायमस्वरूपी पोटगी द्यावी, अशी मागणी अनिषाच्या वकिलांनी न्यायालयापुढे केली.
अजयच्या अनैसर्गिक शरीरसंबंध ठेवण्याच्या मागणीबद्दल तिने नातेवाईक किंवा तिच्या मित्रपरिवाला कल्पना दिली नाही. त्यामुळे तिच्या या ‘कहाणी’वर विश्वास ठेवला जाऊ शकत नाही. पतीबरोबर शारीरिक संबंध न ठेवण्यासाठी तिच्याकडे कोणतेच योग्य कारण नाही. त्यामुळे तिची वर्तवणूक म्हणजे एक प्रकारची क्रूरताच आहे, असे म्हणत कुटुंब न्यायालयाने अजयना दिलासा दिला. त्याचप्रमाणे अनिषाला कायमस्वरूपी पोटगी देण्यास नकार दिला. ‘अनिषा घटस्फोट घेण्यास तयार आहे, मात्र यासाठी तिने कायमस्वरूपी पोटगी देण्याची अट घातली आहे. ही अट पाहता, तिला केवळ अर्जदाराकडून पैसे उकळायचे आहेत, हे स्पष्ट होते. ती म्हणते म्हणून तातडीने पोटगी देता येणार नाही. न्यायालयाला मुद्दे निश्चित करावे लागतील. त्यानंतरच पोटगी देण्यात येईल,’ असे म्हणत कुटुंब न्यायालयाने अनिषाला दिलासा देण्यास नकार दिला. (प्रतिनिधी)

Web Title: Cruelty to call her husband constantly at work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.