हुंड्याची खोटी तक्रार करणे क्रूरता
By admin | Published: September 21, 2015 01:10 AM2015-09-21T01:10:57+5:302015-09-21T01:10:57+5:30
पती व त्याच्या नातेवाइकांना फौजदारी प्रकरणात अडकविण्यासाठी
नागपूर : पती व त्याच्या नातेवाइकांना फौजदारी प्रकरणात अडकविण्यासाठी हुंड्याची खोटी तक्रार नोंदविणे ही बाब क्रूरता ठरते, असा निष्कर्ष मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणावरील आदेशामध्ये नोंदविला आहे. या प्रकरणात न्यायालयाने क्रूरतेच्या आधारावर पतीला घटस्फोट मंजूर केला.
महेश व मान्यता (काल्पनिक नावे) नागपूर येथील रहिवासी असून, त्यांना चार वर्षांचा मुलगा आहे. एकत्र कौटुंबिक जीवन जगणे कठीण झाल्यानंतर महेशने घटस्फोट तर, मान्यताने पोटगी मिळण्यासाठी नागपूर कौटुंबिक न्यायालयात याचिका दाखल केली होती. ६ डिसेंबर २००६ रोजी कौटुंबिक न्यायालयाने महेशची याचिका फेटाळून लावली तर, मान्यताची याचिका स्वीकारून १५०० रुपये पोटगी मंजूर केली. या आदेशाविरुद्ध महेशने उच्च न्यायालयात अपील केले होते. न्यायमूर्ती वासंती नाईक व न्यायमूर्ती ए. आय. एस. चिमा यांनी एकंदरित परिस्थिती लक्षात घेता कौटुंबिक न्यायालयाच्या आदेशात बदल करून महेशला घटस्फोट मंजूर केला. तर, पत्नीची पोटगी कायम ठेवण्यात आली आहे.
महेश व मान्यताचे १९ मे २००२ रोजी लग्न झाले होते. वृद्ध आई-वडील महेशसोबत राहात होते तर, महेशचा भाऊ आपल्या कुटुंबासह वेगळा राहात होता. लग्नानंतर काही दिवसांतच मान्यताची वागणूक बदलली. ती क्षुल्लक कारणांवरून भांडत होती. कोणालाही न सांगता माहेरी जात होती. मान्यताच्या भांडणामुळे हृदयविकाराचा धक्का बसून महेशच्या वडिलांचा मृत्यू झाला.
मुलगा झाल्यानंतरही मान्यताची वागणूक बदलली नाही. ती महेशच्या चारित्र्यावर संशय घेत होती. सासरचे घर सोडल्यानंतर मान्यताने पोलीस ठाण्यात जाऊन पती व त्याचे नातेवाईक हुंडा मागत असल्याची तक्रार नोंदविली. चौकशीमध्ये मान्यताच्या आरोपांत तथ्य आढळून आले नाही. यामुळे पोलिसांनी महेश व त्याच्या नातेवाइकांविरुद्ध एफआयआर नोंदविला नाही. या सर्व बाबी पतीसोबतची क्रूरता ठरत असल्याचे निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदविले आहे.