गळीत हंगामास विलंब होणार ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2016 01:19 AM2016-10-31T01:19:51+5:302016-10-31T01:19:51+5:30

साखर कारखाने सुरू करण्यासाठी आधीच विलंब झाला आहे.

Crunchy season will be delayed? | गळीत हंगामास विलंब होणार ?

गळीत हंगामास विलंब होणार ?

Next


सोमेश्वरनगर : साखर कारखाने सुरू करण्यासाठी आधीच विलंब झाला आहे. शासनाने जरी ५ नोव्हेंबरला साखर कारखाने सुरू करण्याची परवानगी दिली असली, तरी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने उसाला ३ हजार २०० रुपयांची पहिली उचल मिळावी,, अशी मागणी करत आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. त्यामुळे आधीच कारखान्यांच्या गळीत हंगामास उशीर झाला असताना, स्वाभिमानीच्या या भूमिकेमुळे कारखाने ५ नोव्हेंबरला सुरू होणार का, याबाबत प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.
पश्चिम महाराष्ट्रात ऊसदराचे आंदोलन तीव्र झाले आहे. अनेक ठिकाणी जाळपोळीच्या घटना घडल्या आहेत. यामुळे आता अगोदरच साखर कारखाने सुरू होण्यास उशीर झाला आहे. जर स्वाभिमानी शेतकरी संघटना आपली मागणी तडजोडीने सोडवणार की आंदोलनाचे लोन पसरणार, याबाबत ऊसउत्पादकांमधून चर्चा झडू लागल्या आहेत. आज (दि.३०) कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार राजू शेट्टी, जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांच्यासह जिल्ह्यातील काही कारखानदार यांच्यात ऊस दराबाबतची बैठक निष्फळ ठरली. पालकमंत्री चंद्रकांत पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदास राजु शेट्टी आदींच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली. मात्र, ही बैठक कोणताही तोडगा न निघाल्याने निष्फळ ठरली. ५ नोव्हेबरला गळीत हंगाम सुरु होणार आहे. त्यामुळे तत्पुर्वी ऊसदराबाबत तोडगा निघणे अपेक्षित आहे. दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटना ३२०० रुपये ऊसदरावर ठाम आहे. ३ वर्षांपासून एफआरपीमध्ये वाढ केली नसून, याही वर्षी उसाची एफआरपी २३०० रुपये ‘जैसे थे’ ठेवली आहे. मात्र, उसाची एफआरपी जरी कमी असली, तरी राज्यातील उसाच्या घटत्या क्षेत्रामुळे या हंगामात ऊसउत्पादकांची चंगळ होणार असून, गेल्या दहा वर्षांतील सर्वांत उच्चांकी दर मिळणार आहे. या वर्षीची एफआरपी जरी २३०० रुपये असली, तरीही या वर्षी ऊस उत्पादक एफआरपीनुसार दर घेणार नसून, जो कारखाना जादा दर देईन त्या कारखान्यांना शेतकरी ऊस घालणार आहे. बारमाही गुऱ्हाळे टनाला ३२०० रुपये दर देत आहेत, मग कारखानदार का देऊ शकत नाहीत, अशी मागणी ऊस उत्पादकांमधून होत आहे.
> ३२०० रुपये मागणीवर आम्ही ठाम आहोत, कारखान्यांकडे पैसे उपलब्ध आहेत. मात्र, ते मागे-पुढे होऊ शकतात. आज होणारी बैठक एक औपचारिक बैठक आहे. पहिली उचल ३२०० रुपये देता येतीय, यासाठी कसे देता येतील, हा मार्ग काढण्यासाठी बैठकीचे आयोजन केले आहे.
खासदार राजू शेट्टी
अध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना
>आजची साखर कारखान्यांची परिस्थिती पाहता साखर, इथेनॉल, वीज सर्वच गोष्टींना चांगले दर आहेत. त्यामुळे पहिली उचल ३२०० रुपये देता येत आहे. कोणताही उपपदार्थ निर्मिती प्रकल्प नसताना किसन अहिर कारखान्याने गेल्या हंगामातील उसाला २७५० रुपये दर दिला आहे. मग या वर्षी तर साखरेची परिस्थिती चांगली आहे. वन टाईम ३२०० रुपये देता येतील.
- सतीश काकडे,
नेते शेतकरी कृती समिती
> गुऱ्हाळे ३२०० रुपये दर देत आहेत, मग कारखानदांनी ३५०० रुपये दर द्यावा, अशी आमची माणगी आहे. इंदापूर-सोलापूर भागात दुष्काळामुळे ऊस नाही. बेणे व चाऱ्यासाठी ५ हजार रुपये टनाने ऊस सुरू आहे. त्यामुळे पहिली उचल ३५०० रुपयांच्या खाली देता कामा नये. गेल्या वर्षी कायदा मोडून ८०-२० अशी उचल दिली. ३ वर्षे झाले एफआरपी वाढविली नाही.
- रघुनाथ पाटील, नेते शेतकरी संघटना
>३२०० रुपये दर देता येईल यासाठी सरकारने पॉलिसी बदलण्याची गरज आहे. साखर दराशी निगडित पहिली उचल देता येईल. जागतिक बाजारपेठेत साखरेचे दर ३८ ते ३९ रुपयांवर आहेत. मात्र, सरकारने साखर निर्यात शुल्क वाढविले आहे. तर, कोठा पद्धत सुरू केल्याने वेळेत साखर न विकल्यास गुन्हे दाखल करण्याचे सांगितले आहे. जीवनावश्यक वस्तूंमधून साखर वगळली पाहिजे.
- रंजन तावरे, अध्यक्ष, माळेगाव कारखाना

Web Title: Crunchy season will be delayed?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.