महापालिकेत गदारोळ

By admin | Published: June 8, 2017 12:57 AM2017-06-08T00:57:04+5:302017-06-08T00:57:04+5:30

समान पाणीपुरवठा योजनेसाठी २ हजार २६४ कोटी रुपयांचे कर्जरोखे काढण्यावरून महापालिका सभागृहात आणि आवारातही प्रचंड गदारोळ झाला.

Crush in the municipal corporation | महापालिकेत गदारोळ

महापालिकेत गदारोळ

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : समान पाणीपुरवठा योजनेसाठी २ हजार २६४ कोटी रुपयांचे कर्जरोखे काढण्यावरून महापालिका सभागृहात आणि आवारातही प्रचंड गदारोळ झाला. शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी महापालिकेत आंदोलन केली. मनसेने महापौरांच्या अंगावर गाजरे फेकली. तर शिवसेनेने भिक मॉँगो आंदोलन केले.
>शिवसेनेचे महापालिकेत भीक माँगो आंदोलन
पुणे : कर्जरोखे काढण्याच्या या निर्णयाच्या निषेधार्थ पुणे महापालिकेत शिवसेना पुणे जिल्हा संपर्कप्रमुख उदय सामंत आणि महापालिका शिवसेना गटनेता संजय भोसले यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेच्या आवारात भीक माँगो आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात विद्यार्थीदेखील सहभागी झाले होते. ‘काका आमचे खाऊचे पैसे घ्या; मात्र महापालिकेला कर्ज बाजारी करू नका’ या आशयाचा फलक सर्वांचे लक्ष वेधून घेत होता.यावेळी उदय सामंत म्हणाले की, पुणे शहरात समान पाणीपुरवठा योजना राबविण्यासाठी महापालिका कर्ज घेऊन हा प्रकल्प सुरू करण्याच्या निर्णयाचा निषेध असून, ज्या भाजपाला पुणेकर नागरिकांनी भरभरून दिले असताना, कर्ज घेण्याची वेळ आली ही दुर्दैवी बाब असून, राज्य आणि केंद्र सरकारने या कामासाठी निधी दिला पाहिजे, अशी मागणी करीत ते पुढे म्हणाले की, या प्रस्तावाला शिवसेनेचे नगरसेवक सभागृहात तीव्र विरोध करतील, अशी भूमिका त्यांनी मांडली.
>विरोधकांनी घेतलेले आक्षेप
कर्ज किंवा कर्जरोखे असा उल्लेख विषयपत्रात का केला
कर्ज नक्की किती रकमेचे आहे, याबद्दल विषयपत्रात स्पष्ट उल्लेख नाही. २ हजार २६४ कोटी रुपये व त्यानंतर पुन्हा साधारण २० टक्के जास्त असे म्हटले आहे. हे २० टक्के म्हणजे ४५० कोटी होतात, त्याच्यातून कोणती कामे करणार याचा उल्लेख नाही.
हुडको कंपनीबरोबर आयुक्तांनी कोणाला विचारून कर्जासंबंधीचा व व्याजदरासंबंधीचा पत्रव्यवहार केला.
कर्जाच्या हमीसाठी मिळकत कर व पाणीपट्टीतून मिळणाऱ्या रकमेचे वेगळे खाते सुरू करून कर्ज देणाऱ्याला त्यातून त्याचे व्याज व मुद्दल कपात करून घेण्याची मुभा कोणाला विचारून दिली गेली. यासंबंधीच्या अटी व शर्ती सर्वसाधारण सभेची संमती न घेता कशा काय मान्य केल्या.
पाणी योजनेच्या कामात केबलसाठीच्या डक्टचे काम कशासाठी घुसवले. ते मंजूर करावे म्हणून इस्टिमेट कमिटीवर दबाव आणण्याचे कारण काय
डक्टसाठीच्या कामाला स्थायी समिती किंवा सर्वसाधारण सभेची मंजुरी का घेतली गेली नाही.
कर्जफेडीसंबंधी विषयपत्रात काहीही उल्लेख का नाही
कर्जरोखे की कर्ज याचा खुलासा नाही
योजनेतील सर्व कामे एकाच कंपनीला कशी काय मिळत गेली.
योजनेची सल्लागार कंपनी व प्रत्यक्ष करण्यात येणारे काम यातील तफावत सर्वसाधारण सभेसमोर का आणली नाही.
सर्वसाधारण सभेचा अधिकार डावलून योजना का पुढे आणली जात आहे.
>महापौरांच्या अंगावर गाजरफेक
पुणे : पुणे शहराला २४ तास समान पाणीपुरवठा योजना राबविण्यासाठी २ हजार २६४ कोटी रुपयांचे कर्जरोखे उभारण्याचा निर्णय मागील आठवड्यात स्थायी समितीच्या बैठकीत घेण्यात आला. या निर्णयाच्या निषेधार्थ महापालिकेत मनसेचे गटनेते वसंत मोरे यांच्या नेतृत्वाखाली या सर्व पदाधिकाऱ्यांनी गळ्यात गाजराच्या माळा घालून आंदोलन केले, तर यादरम्यान महापौर मुक्ता टिळक यांच्या अंगावर गाजर फेकून निषेध व्यक्त करण्यात आला. या वेळी मनसे गटनेते वसंत मोरे म्हणाले, की पुणे शहरात समान पाणीपुरवठा योजना राबविण्यासाठी महापालिकेला कर्ज उभारावे लागत आहे. ही निषेधार्ह बाब आहे; तसेच या भाजपाला पुणेकरांनी एकहाती सत्ता दिली असताना, महापालिकेला कर्ज घेण्याची वेळ येते, ही दुर्दैवी बाब आहे. त्यामुळे हे आंदोलन करण्यात आले आहे. हा विषय कधी मंजूर करण्यात येणार नाही. याविरोधात भविष्यात अधिक तीव्र लढा उभारला जाणार आहे, असा इशारा त्यांनी दिला.
>भिमालेंनी मागितली माफी
चर्चेदरम्यान सभागृहनेते श्रीनाथ भिमाले यांनी रस्त्याने जाताना कुत्रे भुंकतात, असा शब्द वापरल्यावरून विरोधी सदस्य संतप्त झाले़ सगळ्यांनी एकत्र येत भिमाले यांनी माफी मागावी, अशी मागणी केली़ महिला सदस्या संतप्त झाल्या. अश्विनी कदम यांनी हा अपमान ऐकण्यासाठी बसलो आहोत का, असा सवाल केला़ अखेरीस भिमाले यांनी माफी मागितली़

Web Title: Crush in the municipal corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.