निरूपयोगी प्रकल्पांवर निधीचा चुराडा
By Admin | Published: June 6, 2017 02:22 AM2017-06-06T02:22:52+5:302017-06-06T02:22:52+5:30
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीने कोट्यवधी रुपये खर्च करून मार्केट, निर्यात भवन, शीतगृहांची उभारणी केली
नामदेव मोरे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीने कोट्यवधी रुपये खर्च करून मार्केट, निर्यात भवन, शीतगृहांची उभारणी केली आहे; परंतु उपलब्ध मालमत्तांचा योग्य वापर केला जात नसल्याने त्या धूळखात पडून आहेत. रोड, प्रवेशद्वार व इतर कामांवर फक्त निधी संपविण्यासाठी लाखो रुपयांची उधळपट्टी करण्यात आली असून आतापर्यंत एकही प्रकल्प वेळेत पूर्ण करता आलेला नाही. कोट्यवधी रुपये खर्च करून उभारलेल्या मालमत्तांचा योग्य वापर करण्यातही प्रशासनाला अपयश आले असून या उधळपट्टीला जबाबदार कोण? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.
संचालक मंडळ जाऊन दोन वर्षे झाली तरी मुंबई बाजार समितीमधील अनागोंदी कारभार अद्याप थांबलेला नाही. निधीचा वारेमाप वापर करण्याचे प्रकार सुरूच असून अर्धवट राहिलेली कामे पूर्ण करण्यात प्रशासकांना अपयश आले आहे. भाजी, फळ व धान्य मार्केटमध्ये करोडो रुपये खर्च करून भव्य प्रवेशद्वारांचे बांधकाम सहा वर्षांपूर्वी सुरू केले आहे. प्रवेशद्वारांची रचना करताना त्यामध्ये आवक व जावक गेटमध्ये कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र खोली, सुरक्षा रक्षकांसाठी केबीनचा समावेश केला होता. सर्व आवक- जावक गेट संगणकाने एकमेकांशी जोडले जाणार होते; परंतु अद्याप प्रवेशद्वारांची कामे योग्यपद्धतीने करून घेता आलेली नाहीत. माथाडी भवनसमोर बाजार समितीने कृषी प्लाझाचे बांधकाम केले; पंरतु तेथील दुकाने व कार्यालये अकृषी व्यापाऱ्यांना विकून मोक्याच्या भूखंडांचा दुरुपयोग केला आहे. भाजी मार्केटमधील बिगरगाळाधारकांसाठी स्वतंत्र मार्केटचे बांधकाम केले; परंतु सर्व व्यापारी अद्याप जुन्याच मार्केटमध्ये व्यापार करत असून त्यांच्यासाठी बांधलेले गाळे भाडेतत्त्वावर देण्यात आले आहेत. धान्य मार्केटच्या समोरील बाजूला निर्यात भवनसाठी चार मजली इमारतीचे बांधकाम केले आहे; परंतु तेथील गाळ्यांची विक्री करण्यात अपयश आले आहे. नवीन मार्केट धूळखात पडून असून, त्यामधील बांधकाम खर्चही विक्रीतून निघेल की नाही, याविषयी संभ्रम निर्माण झाला आहे.
फळ मार्केटमधील बिगर गाळाधारक व्यापाऱ्यांसाठी नवीन मार्केटचे बांधकाम सहा वर्षांपूर्वी सुरू केले आहे; परंतु ते अद्याप पूर्ण होऊ शकलेले नाही. बांधलेल्या मार्केटमध्ये फळांचा व्यापार होण्याची शक्यताही कमी व्यक्त केली असून फक्त संस्थेचे पैसे खर्च करण्यासाठी भव्य इमारत उभी करण्यात आलेली आहे. कृषी प्लाझाच्या मागील बाजूलाही निर्यात भवनचे बांधकाम सुरू आहे. त्याची रचनाही निर्यात भवनऐवजी शॉपिंग मॉलप्रमाणे करण्यात आलेली असून ते कामही धिम्या गतीने सुरू आहे.
फळ मार्केटमधील निर्यात भवन, मध्यवर्ती सुविधागृह, भाजी व मसाला मार्केटमधील मध्यवर्ती सुविधागृह, मसाला मार्केटच्या बाजूला असणारे सामाजिक सुविधागृह या इमारतींची देखभाल व योग्य वापर करण्यासही प्रशासनाला अपयश आले आहे असून, याला जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
निधी संपविण्यासाठी कामे
शासनाच्या बदलत्या धोरणांमुळे बाजार समितीचे अस्तित्व धोक्यात आले आहे. संस्थेचे उत्पन्न वाढविण्याऐवजी असणारा निधी संपविण्याकडे प्रशासनाचा कल आहे. यापूर्वीही धान्य मार्केटमधील मध्यवर्ती सुविधागृह इमारतीच्या समोर संचालकांच्या मागणीवरून विनाकारण भिंत उभारून त्यावर लाखोंचा निधी खर्च करण्यात आला. प्रवेशद्वारांच्या कामांवरही प्रचंड पैसे खर्च करण्यात आले असून निर्यात भवन, कृषी प्लाझा अशी नावे देऊन इमारती उभ्या करण्यात येत असून त्याचा वापर होत नसल्याने फक्त निधी संपविण्यासाठीच कामे केली जात असल्याचा आरोप होत आहे.
मोक्याचे भूखंड दुसऱ्यांच्या घशात
बाजार समितीने मोक्याचे भूखंड इतरांच्या घशात घालण्यास सुरुवात केली आहे. यापूर्वी धान्य मार्केटमधील मोक्याची जागा खासगी शिक्षण संस्थेला दिली आहे. वाय विंगमधील पहिल्या मजल्यावरील जागा शिक्षण संस्थेला विकली आहे. माथाडी भवनसमोरील कृषी प्लाझाची अत्यंत मोक्याची जागा इलेक्ट्रिक वस्तू विक्रेत्यांच्या घशात घातली असून त्या मागील बाजूला निर्यात भवनच्या नावाखाली शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारले जात आहे.
इमारती होत आहेत धोकादायक
एपीएमसी नवीन इमारती बांधण्यावर करोडो रूपये खर्च करत आहेत; परंतु अस्तित्वात असलेल्या इमारतींची योग्य देखभाल केली जात नाही. फळ मार्केटमधील दोन, भाजी, मसाला मार्केटमधील प्रत्येकी एक व मसाला मार्केटच्या बाजूला असलेली सामाजिक सुविधेसाठीच्या इमारतीची दुरवस्था होऊ लागली आहे. देखभालीअभावी या वास्तू धोकादायक ठरत असून त्यांची डागडुजी व रंगरंगोटी करण्याकडेही दुर्लक्ष केले जात आहे.