300 पीएचडी विद्यार्थ्यांची फेलोशीप रद्द, संशोधन प्रगती अहवालाला विलंब केल्याने ‘सीएसआयआर’चा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2024 06:49 AM2024-01-18T06:49:50+5:302024-01-18T06:50:09+5:30

मुंबई : संशोधन प्रगती अहवाल देण्यास विलंब केला म्हणून देशभरातील २०० ते ३०० पीएचडीच्या विद्यार्थ्यांची फेलोशिप कौन्सिल ऑफ सायंटिफीक ...

CSIR decision to cancel fellowship of 300 PhD students, delaying research progress report | 300 पीएचडी विद्यार्थ्यांची फेलोशीप रद्द, संशोधन प्रगती अहवालाला विलंब केल्याने ‘सीएसआयआर’चा निर्णय

300 पीएचडी विद्यार्थ्यांची फेलोशीप रद्द, संशोधन प्रगती अहवालाला विलंब केल्याने ‘सीएसआयआर’चा निर्णय

मुंबई : संशोधन प्रगती अहवाल देण्यास विलंब केला म्हणून देशभरातील २०० ते ३०० पीएचडीच्या विद्यार्थ्यांची फेलोशिप कौन्सिल ऑफ सायंटिफीक ॲण्ड इंडिस्ट्रिअल रिसर्चने (सीएसआयआर) रद्द केली आहे.

संशोधक विद्यार्थ्यांचे प्रश्न मांडणाऱ्या ‘ऑल इंडिया रिसर्च स्कॉलर्स असोसिएशन’ने (एआयआरएसए) याबाबत ‘सीएसआयआर’ला पत्र लिहून हा निर्णय मागे घेण्याची मागणी केली आहे. ‘सीएसआयआर’ची पीएचडी फेलोशीप मिळविणाऱ्यांना दरवर्षी आपला संशोधनाचा प्रगती अहवाल मार्गदर्शकांच्या सहीने सादर करावा लागतो. हा अहवाल देण्यास विलंब झाल्याने या विद्यार्थ्यांची फेलोशिप रद्द करण्यात आली आहे. 

हे विद्यार्थी विविध विद्यापीठे आणि संशोधन संस्थांमध्ये काम करीत आहेत. याचा अभ्यासक विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व वैयक्तिक आयुष्यावर प्रतिकूल परिणाम होईल. त्यामुळे त्यांची फेलोशिप रद्द करण्यापूर्वी संशोधक विद्यार्थ्यांना त्यांची बाजू मांडण्याची संधी देण्यात यावी, 
अशी मागणी ‘एआयआरएसए’ने केली आहे.

 वैयक्तिक, प्रशासकीय अडचणींबरोबरच संशोधन प्रक्रियेतही विविध आव्हाने उभी राहतात. त्यामुळे प्रगती अहवाल सादर करण्यास विलंब होतो. या विद्यार्थ्यांनी ‘सीएसआयआर’च्या मनुष्यबळ विकास विभागाच्या प्रमुखांशी संबंध साधून आपल्या अडचणी लेखी व तोंडी स्वरूपात मांडण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांना संबंधितांकडून प्रतिसाद मिळाला नाही, याकडे संघटनेने लक्ष वेधले आहे. संघटनेने याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही पत्र लिहून आपली कैफियत मांडली आहे. 

फेलोशिपच्या निधीला विलंब   
संघटनेने फेलोशिपच्या निधी वितरणात होणाऱ्या विलंबाकडे लक्ष वेधले आहे. सीएसआयआरसह अनेक संस्थांकडून फेलोशिपचा निधी मिळण्यास विलंब होतो, असे संघटनेचे म्हणणे आहे.

फेलोशिपसाठी निवड
सीएसआयआरतर्फे एम.एस्सी, बी.ई, बी.टेक, एम.टेक, एम.ई, एमबीबीएस, बी.डी.एस, एम.डी, एम.एस, एम.डी.एस, एम.ई, एम.टेक, एम.व्ही.एससी यांसारखी पात्रता असलेल्या  विद्यार्थ्यांना संशोधनासाठी फेलोशिप दिली जाते. यासाठी वय ३२ ते ३५ वर्षांच्या दरम्यान असावे. पात्रताधारक उमेदवारांचे संशोधन कार्य, अनुभव आदींच्या आधारे मुलाखत घेऊन या फेलोशिपसाठी निवड केली जाते. त्यासाठी दरमहा व आकस्मित म्हणून ठराविक निधी दिला जातो.

Web Title: CSIR decision to cancel fellowship of 300 PhD students, delaying research progress report

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.