सीएसएमटी, माथेरान स्थानकांत स्तनपान कक्ष - मध्य रेल्वेचा निर्णय
By Admin | Published: July 7, 2017 07:45 PM2017-07-07T19:45:01+5:302017-07-07T19:45:01+5:30
रेल्वे प्रवासादरम्यान महिलांना शिशुंसाठीच्या स्तनपानाकरिता अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. परिणामी यावर सारासार विचार करत मध्य रेल्वे प्रशासनाकडून छत्रपती शिवाजी
>- महेश चेमटे/ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 07 - रेल्वे प्रवासादरम्यान महिलांना शिशुंसाठीच्या स्तनपानाकरिता अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. परिणामी यावर सारासार विचार करत मध्य रेल्वे प्रशासनाकडून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि माथेरान स्थानकात स्तनपान कक्ष उभारण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या ‘ए-१’ आणि ए दर्जाच्या स्थानकांत टप्प्या टप्प्याने स्तनपान कक्ष उभारण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.
रेल्वे मंत्रालयाच्या आदेशानूसार देशातील विविध रेल्वे स्थानकांवर स्तनपान कक्ष उभारण्यात येणार आहे. त्यानूसार सुरुवातीला ‘ए-१’ आणि ए दर्जाच्या रेल्वे स्थानकात स्तनपान कक्ष उभारण्यात येणार आहे. स्थानकातील ‘प्रतिक्षालय’ अर्थात ‘वेटिंग रुम’ मध्ये हे स्वतंत्र कक्ष उभारण्यात येणार आहे. ज्या स्थानकांवर प्रतिक्षालय नाही. त्या स्थानकांवर महिला प्रवाशांची सुरक्षितता लक्षात घेत स्तनपान कक्ष उभारण्यात येणार आहे.
पहिल्या टप्प्यात मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे स्तनपान कक्ष उभारण्यात येणार आहे. तर पर्यटकांचे नंदनवन समजल्या जाणा-या आणि टॉय ट्रेनसाठी प्रसिद्ध असलेल्या माथेरान स्थानकात स्तनपान कक्ष उभारण्यात येणार आहे. दुस-या टप्प्यात लोकमान्य टिळक टर्मिनस, दादर, ठाणे, कल्याण, पनवेल, लोणावळा आणि इगतपूरी या मरेच्या स्थानकांवर महिलांसाठीच्या विशेष सेवा देण्यात येणार आहे.