सीएसटी मोफत पाहण्याची संधी
By admin | Published: July 1, 2016 04:31 AM2016-07-01T04:31:14+5:302016-07-01T04:31:14+5:30
वर्ल्ड हेरिटेजचा दर्जा प्राप्त असलेले सीएसटी स्थानक आणि त्यातील म्युझियम पाहण्यासाठी मध्य रेल्वेकडून शुल्क आकारले जाते.
मुंबई : वर्ल्ड हेरिटेजचा दर्जा प्राप्त असलेले सीएसटी स्थानक आणि त्यातील म्युझियम पाहण्यासाठी मध्य रेल्वेकडून शुल्क आकारले जाते. मात्र २ जुलैपासून मध्य रेल्वेकडून हेरिटेज सप्ताह साजरा केला जाणार असून ८ जुलैपर्यंत सीएसटीला भेट देणाऱ्यांसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नसल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
२ जुलै २00४ रोजी सीएसटी स्थानकाचा युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेजच्या यादीत समावेश करण्यात आला. वर्ल्ड हेरिटेजचा दर्जा प्राप्त असणारे मुंबईतील हे एकमेव स्थानक ठरले. या स्थानकाला मोठ्या संख्येने पर्यटक भेट देत असतात. आता स्थानकात २ जुलैपासून मध्य रेल्वेकडून ‘हेरिटेज सप्ताह’ साजरा केला जाणार असून तो ८ जुलैपर्यंत सुरू राहील, अशी माहिती अपर महाव्यवस्थापक ए.के. श्रीवास्तव यांनी दिली. या सप्ताहात हेरिटेज वॉक, प्रदर्शन, सीएसटी येथील मुख्यालयाच्या डायनिंग हॉलमध्ये चर्चात्मक कार्यक्रमांचे आयोजनही केले आहे. महत्त्वाची बाब म्हणजे सीएसटी स्थानकाला भेट देणाऱ्यांसाठी २ जुलै ते ८ जुलैपर्यंत कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही. त्यांना सीएसटीचे अंतर्गत बांधकाम आणि म्युझियमही
पाहता येईल, असेही श्रीवास्तव म्हणाले. (प्रतिनिधी)
>२ जुलै रोजी सकाळी ९ वाजता ‘हेरिटेज वॉक’ आणि प्लॅटफॉर्म क्रमांक सात आणि आठवर
प्रदर्शन असेल.
३ जुलै रोजी शालेय विद्यार्थ्यांसाठी ‘हेरिटेज वॉक’ आणि रेल्वे विषयासंदर्भात प्रश्नमंजुषा होईल.
४ जुलै रोजी सीएसटी डायनिंग हॉलमध्ये हेरिटेजशी संबंधित तज्ज्ञांचा चर्चात्मक कार्यक्रम होणार आहे.
५ जुलै ‘मुंबई आणि रेल्वे’ या विषयावर रफिक बगदादी यांच्याशी चर्चा.
७ जुलै रोजी जे.जे. स्कूल आॅफ आर्ट्सचे संचालक राजीव मिश्रा आणि संवर्धन वास्तुविशारद विकास दिलावरी यांची चर्चा होईल.
८ जुलै रोजी ‘चित्रपट आणि रेल्वे’ विषयावर चर्चा होणार आहे.