सीएसटी नावात ‘महाराज’चा समावेश
By admin | Published: July 1, 2017 03:03 AM2017-07-01T03:03:21+5:302017-07-01T03:03:21+5:30
बहुप्रतीक्षेत‘महाराज’ नावासाठी रेल्वे प्रशासन अखेर कामाला लागले. छत्रपती शिवाजी टर्मिनसचा नामविस्तार छत्रपती शिवाजी महाराज
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : बहुप्रतीक्षेत‘महाराज’ नावासाठी रेल्वे प्रशासन अखेर कामाला लागले. छत्रपती शिवाजी टर्मिनसचा नामविस्तार छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस असे करण्याच्या हालचालींना वेग आला. मात्र, स्थानकाचा सांकेतिक कोड ‘सीएसटीएम’ हाच कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
छत्रपती शिवाजी टर्मिनस असा उल्लेख करताना, ‘महाराज’ या आदरार्थी शब्दाचा समावेश करण्याची मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित होती. ‘महाराज’ शब्द वापरण्यासाठी परवानगी देत, १ जुलैपासून त्याची अमंलबजावणी करण्याच्या सूचना रेल्वे प्रशासनाने दिल्या. त्यानुसार, स्थानकाच्या नामफलकात, अनाउन्समेंटमध्ये, लोकल-एक्स्प्रेस तिकीट, लोकल पासमध्येदेखील ‘महाराज’ शब्दाचा समावेश करण्यात आला आहे. येत्या काही दिवसांत सीएसटी स्थानकातील नामफलकात ‘महाराज’ शब्द दिसणार आहे. सीएसटीएम स्थानकात उद्घोषणा प्रणालीमध्येदेखील बदल करण्यात आला आहे.
कोड न बदलण्यास कारण की...
कोल्हापूर स्थानकाचे छत्रपती शाहू महाराज टर्मिनस असे नाव असून, त्याचा सांकेतिक कोड सीएसएमटी असा आहे. परिणामी, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या सांकेतिक कोडमध्ये बदल केल्यास अडचण होऊ शकेल. एकाच सांकेतिक कोडमुळे प्रवाशांमध्ये गोंधळ निर्माण होईल. त्यामुळे ‘सीएसटीएम’ हा सांकेतिक कोड कायम ठेवण्यात आला आहे.