कौटुंबिक हिंसाचाराचा कळस, सुनेच्या पोटात घुसवल्या सुया; डॉक्टरांनी दिलं जीवदान
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2021 02:46 AM2021-01-24T02:46:54+5:302021-01-24T07:12:43+5:30
चार तास शस्त्रक्रिया करून काढल्या सुया, सावंगी रुग्णालयाकडून जीवदान
वर्धा : बाळाच्या जन्माच्या दिवशीच पतीचा मृत्यू झाला म्हणून बाळासह सुनेलाही अपशकुनी ठरवत तिच्या पोटात चक्क इंजेक्शनच्या सुया टोचण्याचे पातक सासरच्यांनी केले. मात्र, तब्बल दहा महिन्यानंतर तिच्या पोटातून चार तास शस्त्रक्रियेद्वारे त्या सुया काढून तिला जीवदान देण्याचे पुण्य सावंगी मेघे येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयाच्या डॉक्टरांनी कमावले.
नागपूर येथील ३२ वर्षीय महिलेच्या पोटात वेदना होत असल्याने ती सावंगी येथील रुग्णालयात उपचारार्थ दाखल झाली होती. सिटीस्कॅन केले असता, तिच्या पोटात वेगवेगळ्या ठिकाणी धातूच्या तीन सुया दिसून आल्या. या सुया पोटात गेल्या कशा, याची माहिती घेतली असता, कौटुंबिक हिंसाचाराचे विदारक सत्य पुढे आले.
दहा महिन्यांपूर्वी महिलेने एका बाळाला जन्म दिला. मात्र, जन्माच्याच दिवशी तिच्या पतीचा अपघाती मृत्यू झाला. हे नवजात बाळ अपशकुनी आहे, त्याच्यामुळे आमच्या मुलाचा मृत्यू झाला, अशी हेटाळणी सासरी सुरू झाली. तिला सतत सासरच्या मंडळींची बाेलणी ऐकायला लागत हाेती. अखेर सतत हाेणाऱ्या या जाचाला कंटाळून महिला माहेरी परतली. माहेरी असताना तिच्या पोटात दुखणे सुरू झाले. संसर्ग वाढल्याने तिने जेवण करणेही साेडून दिले. कुटुंबातील सदस्यांनी तिला सावंगी येथील रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात अद्ययावत उपकरणांद्वारे तपासणी केली असता, तिच्या पोटात बळजबरीने इंजेक्शनच्या नीडल्स सोडण्यात आल्याचे धक्कादायक वास्तव पुढे आले.
परिचारिका राहिलेल्या घरातील एका व्यक्तीने या सुया घुसविल्याचे समोर आले. उदरपोकळीत शिरलेल्या या सुयांचा सुमारे दहा महिन्यानंतर त्रास सुरू झाल्याने ही घटना समोर आली. त्यानंतर घडलेल्या या प्रकरणाला वाचा फुटली. ज्येष्ठ शल्यचिकित्सक डॉ. मीनाक्षी येवला पाटे यांच्या मार्गदर्शनात पुढील तपासण्या आणि उपचार सुरू झाले. एका सुईवर मास चढलेले असल्यामुळे शस्त्रक्रियेत अडथळा निर्माण झाला. अखेर चार तास शस्त्रक्रिया करीत या तीनही सुया काढण्यात आल्या.