कळंबा तलावात सापडला शाहूपूर्वकालीन पाण्याचा पाट

By Admin | Published: April 11, 2016 03:13 AM2016-04-11T03:13:07+5:302016-04-11T03:13:07+5:30

येथील ऐतिहासिक कळंबा तलावात गाळ काढण्याचे काम सुरू असताना शनिवारी दुपारी सुमारे अडीचशे वर्षांहून अधिक जुना शहराच्या पहिल्या पाणी योजनेच्या पाण्याचा पाट आढळला.

The culmination of the Shahpur-era water found in the pond | कळंबा तलावात सापडला शाहूपूर्वकालीन पाण्याचा पाट

कळंबा तलावात सापडला शाहूपूर्वकालीन पाण्याचा पाट

googlenewsNext

कोल्हापूर : येथील ऐतिहासिक कळंबा तलावात गाळ काढण्याचे काम सुरू असताना शनिवारी दुपारी सुमारे अडीचशे वर्षांहून अधिक जुना शहराच्या पहिल्या पाणी योजनेच्या पाण्याचा पाट आढळला. तो पाहण्यासाठी लोकांची गर्दी उसळली होती. महापौर अश्विनी रामाणे व उपसरपंच दीपक तिवले यांनी गाळ काढण्याचे काम थोडा वेळ थांबवून पाट रिकामा करण्याच्या सूचना दिल्या. चुनखडीच्या बांधकामातील दोन बाय दोन फूट लांबी-रुंदीचा अतिशय सुंदर घडण असलेला हा पाट आहे.
तलावाच्या इतिहासात प्रथमच यंदा पाऊसमान कमी झाल्यामुळे कळंबा तलाव पूर्णत: आटला आहे. यामुळे जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत जलसंपदा विभागातर्फे तलावातील गाळ काढण्याचे काम गेले तीन आठवडे सुरू आहे. दुपारी पोकलँडच्या साहाय्याने गाळउपसा सुरू असताना, चालक कुमार गोरंबेकर यांना हा पाट दिसून आला. त्यांनी ही माहिती उपसरपंच दीपक तिवले यांना दिली. शाहूपूर्वकालीन असलेला हा पाट गाळाच्या खाली सात फूट ढिगाखाली होता. हा पाट आजही मजबूत व पाणी वाहून जाईल, असा आहे. त्यामध्ये पाणी होते. त्यास खापरी नळ योजना, असेही म्हटले जाते.
जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार, कात्यायनी मंदिराच्या पिछाडीस अमृत, राम, परशुराम ही कुंडे आहेत. ज्यातील पाणी प्रदूषणविरहित असे. कोल्हापुरात १७६० मध्ये २१ तळी होती, पण नागरी प्रदूषणामुळे पाणी पिण्यास योग्य नव्हते. रंकाळ््याचे पाणी पिण्यास चांगले होते, परंतु पूर्ण क्षमतेने शहरात पुरवठा करता येत नव्हता. पुण्याच्या बाबुराव केशव ठाकूर या व्यापाऱ्याची महालक्ष्मीवर श्रद्धा होती. शहरातील पाण्याची अडचण समजून घेऊन त्यांनी कात्यायनीतील कुंडातील हे पाणी पाटाद्वारे शहरात आणण्याची योजना आखली. तीन लाख रुपये खर्च करून हे पाणी नळावाटे महालक्ष्मी मंदिरातील दोन हौदात व शहरात ३२ विहिरींमध्ये सोडले होते. तोच हा पाट सापडल्याने अडीचशे वर्षांपूर्वीच्या इतिहासास उजाळा मिळाला. तलावात पाट सापडल्याचे दुपारी गावात समजताच ग्रामस्थांनी तलावाकडे धाव घेतली. पाट बघण्यासाठी नागरिकांची झुंबड उडाली होती.
घटनास्थळी माजी नगरसेवक मधुकर रामाणे, नगरसेविका दीपा मगदूम, पर्यावरणप्रेमी उदय गायकवाड आदींनी भेट दिली व पाटाची माहिती घेतली. (प्रतिनिधी)

Web Title: The culmination of the Shahpur-era water found in the pond

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.