लाखोंनी अनुभवला तुकोबांचा बीज सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2017 03:57 AM2017-03-15T03:57:35+5:302017-03-15T03:57:35+5:30
संत जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या ३६९व्या बीज सोहळ्यात गुरुवारी राज्यभरातील सुमारे तीन लाख भाविक सहभागी झाले होते
देहूगाव (जि. पुणे) : संत जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या ३६९व्या बीज सोहळ्यात गुरुवारी राज्यभरातील सुमारे तीन लाख भाविक सहभागी झाले होते. श्री संत तुकाराममहाराज संस्थानाच्या वतीने पहाटे चारपासूनच विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
मंदिरात पहाटे चारला काकडारती झाल्यानंतर मुख्य मंदिरातील पांडुरंगाच्या व श्री संत तुकाराम महाराजांच्या शिळामंदिरातील महापूजा श्री संत तुकाराममहाराज संस्थानाचे अध्यक्ष शांताराममहाराज मोरे, विश्वस्त अभिजित मोरे, सरपंच सुनीता टिळेकर यांच्या हस्ते झाली. पहाटे सहाला वैकुंठगमन मंदिरातील श्री संत तुकाराममहाराजांची महापूजा झाली.
बीजोत्सव सोहळ्यात सहभागी होण्यासाठी यात्रेपूर्वी दाखल झालेल्या दिंड्यांच्या फडावर रात्रभर जागर, पहाटे काकडारती, महापूजा, हरिपाठ वीणा-टाळ-मृदंग यांच्या साथीत भजन-कीर्तनासह हरिनामाच्या जयघोषासह विठ्ठल नामाचा मंत्र जपण्यात सारे वैष्णव दंग झाले होते. पहाटे महापूजा झाल्यानंतर भाविकांना मंदिरात दर्शनासाठी प्रवेश देण्यात आला. सकाळपासूनच मानाच्या दिंड्या मारुती मंदिरापुढे अभंग-आरती घेऊन पालखीमार्गाने मंदिरात प्रवेश करीत होत्या. मंदिराला प्रदक्षिणा घालून हरिनामाचा गजर करीत उत्तर दरवाजाने देऊळवाड्याच्या बाहेर पडत होत्या. तुतारीवादक तांबे यांनी इशारा केला आणि पालखीचे भोई सेवेकऱ्यांसह अनेक भाविकांनी महाराजांच्या पालखीला सेवेचा खांदा दिला. पालखी पावणेबाराच्या सुमारास वैकुंठगमन मंदिराच्या आवारात असणाऱ्या नांदुरकीच्या झाडाखाली आली. येथे महाराजांच्या वंशातील बापूमहाराज मोरे देहूकर यांचे प्रथेप्रमाणे श्री संत तुकाराम महाराजांच्या महानिर्वाण प्रसंगावरील कीर्तन झाले. दुपारी बारा वाजता बोला पुंडलिका वरदा हारी विठ्ठल, असा हरिनामाचा व श्री संत तुकाराम महाराजांच्या नामाचा गजर करीत भाविकांनी नांदुरकीच्या झाडावर पुष्पवृष्टी केली. पालकमंत्री गिरीश बापट, खासदार अमर साबळे, आमदार लक्ष्मण जगताप, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)