अल्पसंख्याक दर्जामुळे सांस्कृतिक संवर्धनाला वाव! ज्यू धर्मीय आनंदी
By admin | Published: June 23, 2016 05:07 AM2016-06-23T05:07:10+5:302016-06-23T05:07:10+5:30
ज्यू समुदायाला अल्पसंख्याक दर्जा देण्याच्या राज्य शासनाच्या निर्णयाचे या अत्यल्पसंख्य समाजाने स्वागत केले आहे. या निणर्यामुळे विशेष सरकारी योजनांचा तसेच शिष्यवृत्तींचा लाभही त्यांना मिळणार
ओंकार करंबेळकर, मुंबई
ज्यू समुदायाला अल्पसंख्याक दर्जा देण्याच्या राज्य शासनाच्या निर्णयाचे या अत्यल्पसंख्य समाजाने स्वागत केले आहे. या निणर्यामुळे विशेष सरकारी योजनांचा तसेच शिष्यवृत्तींचा लाभही त्यांना मिळणार असून, भारतीय विविधतेत टिकून राहिलेल्या त्यांच्या संस्कृतीचे संवर्धन करण्यासही वाव मिळणार असल्याच्या भावना त्यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केल्या.
भारतामध्ये दोन हजार वर्षांपूर्वी आलेले ज्यू बांधव येथील संस्कृतीचाच एक भाग बनून गेले. स्वातंत्र्यप्राप्तीच्या आसपास ३० हजार लोकसंख्या असणाऱ्या या समुदायाचे आता केवळ ४,६५० सदस्य भारतात राहिले आहेत. त्यातील २,४६६ सदस्य महाराष्ट्रामध्ये राहतात. इतक्या लहानशा समुदायाच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी या अल्पसंख्याक दर्जाचा नक्कीच लाभ होणार आहे. यामध्ये अल्पसंख्याकांसाठी असणाऱ्या योजनांचा लाभ तसेच हेरिटेज स्थळे (ज्यूंची वारसास्थळे) जपण्यासाठीही मदत मिळू शकेल. आजवर जन्म-मृत्यू प्रमाणपत्रे, विवाह प्रमाणपत्रे यांच्यावर ज्यूंचा समावेश ‘इतर’ अशा विभागात केला जात असे. त्याऐवजी ज्यू असा उल्लेख करणे शक्य होणार आहे. कालच्या घोषणेचा आणखी एक महत्त्वाचा फायदा म्हणजे ज्यू धर्मीयांना त्यांच्या पवित्र तीर्थस्थळी म्हणजे जेरूसलेमला जाण्यासाठी मदत मिळणार आहे. ज्यू धर्मीयांना शैक्षणिक संस्थांची स्थापना करता येणे शक्य होणार असून, समुदायातील मुलांसाठी काही जागा आरक्षित ठेवता येतील.
ज्यू समुदाय नेहमीच देशाच्या विकासात भागीदार राहिला असून, अल्पसंख्य असूनही बहुसंख्याक समाजाला तो कसा मदत करू शकेल याकडे लक्ष देण्याची गरज ठाण्यात राहणाऱ्या एरिक सॅम्युएल अक्षीकर यांनी व्यक्त केले. ज्यू धर्मीयांच्या योम किप्पूर आणि रोश हाशन्ना सणासाठी सुटीची मागणीही केली जात असून ती लवकर मान्य केली जाईल, अशी आशा त्यांना आहे. ज्यू धर्मीयांच्या आरोग्य आणि शिक्षणासाठी विशेष योजना व्हाव्यात तसेच त्यांच्या वसाहतींसाठी प्रयत्न व्हावेत. जेरुसलेम भेटीला मदत मिळाल्यामुळे गरीब ज्यू बांधवांना आधार मिळाला आहे, असे मत अमेरिकास्थित एडना सॅम्युएल या व्यावसायिकेने व्यक्त केले आहे. माझगाव येथे गेली १४० वर्षे सुरू असणाऱ्या सर एली कदूर शाळेचे संचालक अॅड. डेव्हीड तळेगावकर यांनीही सरकारचे आभार मानले आहेत. ज्यू धर्मीयांनी अल्पसंख्याक दर्जा मिळविण्यासाठी केंद्र सरकारकडे या वर्षीच प्रस्ताव पाठविला आहे. तो विचारार्थ असून त्याआधीच महाराष्ट्र सरकारने त्यांना अल्पसंख्याक दर्जा दिला आहे. महाराष्ट्रात रायगड, ठाणे, मुंबई आणि पुणे येथे ज्यू एकवटले असून, त्यांचे महाराष्ट्राशी आणि कोकणाशी विशेष नाते आहे. ज्या गावांमध्ये स्थायिक झाले त्या गावाच्या नावाने त्यांनी पेणकर, किहीमकर, घोसाळकर, रोहेकर अशी आडनावे घेतली. मुंबई आणि पुण्याच्या स्थापत्य, शिक्षण, आरोग्य तसेच व्यापारामध्ये ज्यू धर्मीयांचा विशेष वाटा आहे. डेव्हीड ससून लायब्ररी तसेच ससून डॉक हे त्याचाच भाग आहेत. महाराष्ट्राप्रमाणे केरळ, कोलकाता येथेही ज्यू धर्मीयांनी विशेष कार्य केले. बेने मनाशे नावाने ओळखला जाणार ज्यू समुदाय ईशान्य भारतात वास्तव्यास असून, त्यातीलही काही सदस्य इस्रायलला गेले आहेत. कवी निस्सिम इझिकेल, १९७१ च्या युद्धात महत्त्वाची भूमिका बजावणारे जे.एफ.आर जेकब, डेव्हीड ससून, अभिनेत्री नादिरा, सुलोचना (रुबी मायर्स) अशा अनेक ज्यू धर्मीयांनी भारताच्या सांस्कृतिक, साहित्य, संरक्षण, व्यापार क्षेत्रात महत्त्वाचे योगदान दिले.
आम्हाला स्थान मिळाले : आमच्या मुलामुलींचे विवाह किंवा जन्म प्रमाणपत्राच्या वेळेस ‘इतर’ अशा चौकटीमध्ये आम्हाला टाकले जाई. मात्र आता या दर्जामुळे ज्यू असा विशेष उल्लेख प्रमाणपत्रांवर सुरू होईल तसेच जनगणनमध्ये आमची ज्यू म्हणूनच गणना होईल, हा मोठा बदल होणार आहे. आमच्या कित्येक बांधवांना जेरूसलेमला जाण्यासाठी मदतही कालच्या निर्णयामुळे होणार आहे. जेरुसलेम भेटीसाठी ज्यूईश मायनॉरिटी कमिटीसारखी संस्था स्थापन करून त्याद्वारे प्रवासाचे नियोजन करण्याचा आमचा विचार आहे. शांततामय पद्धतीने जीवन जगणाऱ्या ज्यू समुदायाला महाराष्ट्र सरकारने प्रलंबित मागणी मान्य करून मदत केली आहे. - एझरा मोझेस, सचिव, इंडियन ज्युईश फेडरेशन