सांस्कृतिक माहेरघराला गालबोट
By admin | Published: March 4, 2017 12:41 AM2017-03-04T00:41:09+5:302017-03-04T00:41:09+5:30
वेळ दुपारी ३ वाजताची. स्पर्धा परीक्षेविषयीचे व्याख्यान ऐकण्यासाठी विद्यार्थ्यांची पावले बालगंधर्वकडे वळू लागली.
पुणे : वेळ दुपारी ३ वाजताची. स्पर्धा परीक्षेविषयीचे व्याख्यान ऐकण्यासाठी विद्यार्थ्यांची पावले बालगंधर्वकडे वळू लागली. बघता-बघता सभागृहाच्या क्षमतेपेक्षाही अधिक विद्यार्थी रंगमंदिरामध्ये दाखल झाले. परिसरातही गर्दीने उच्चांक गाठला.. प्रत्येकालाच आत जायचे होते; मात्र सभागृह ‘हाऊसफुल्ल’ झाल्याने कर्मचाऱ्यांनी शटर अर्धवट ओढून घेतले आणि विद्यार्थ्यांची तिथेच ‘सटकली’. प्रवेश नाकारल्यामुळे विद्यार्थ्यांच्या जमावाने दरवाजासह बालगंधर्व रंगमंदिराच्या नावाची तोडफोड केली. स्पर्धा परीक्षेमधून प्रशासकीय सेवेत पाऊल टाकणाऱ्या या विद्यार्थ्यांकडूनच शिक्षण आणि सांस्कृतिक माहेरघराला गालबोट लावण्याचा हा प्रकार शुक्रवारी घडला.
बालगंधर्व रंगामंदिर येथे श्री बालाजी फाउंडेशनच्या वतीने ज्येष्ठ सनदी अधिकारी भरत आंधळे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनीच विद्यार्थ्यांसाठी स्थापन केलेल्या या संस्थेचा हा पहिलाच जाहीर कार्यक्रम होता. हा कार्यक्रम विनामूल्य असल्याने या व्याख्यानासाठी ग्रामीण भागातून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. रंगमंदिराची आसनक्षमता जवळपास एक हजाराची आहे. त्यात बाल्कनीची क्षमता ३२०, तर खाली ६६९ लोक बसू शकतील एवढी क्षमता आहे. मात्र, बाल्कनीत खूप गर्दी झाली होती. एका खुर्चीत दोन विद्यार्थी बसले होते. बाल्कनी कोसळण्याची भीती कर्मचाऱ्यांना वाटत होती. आत एवढी गर्दी झाल्यानंतर सुरक्षारक्षकाने विद्यार्थ्यांना प्रवेशद्वारावरच अडविले. त्या वेळी पाठीमागून अचानक आलेल्या विद्यार्थ्यांच्या घोळक्यामुळे प्रवेशद्वाराचे गज वाकले. त्यामुळे परिसरात काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. विद्यार्थ्यांची चेंगराचेंगरी झाली. त्यात काही तरुणीदेखील होत्या, त्याही जखमी झाल्या. अखेर व्यवस्थापकांना पोलिसांना पाचारण करावे लागले. व्यवस्थापकांना कार्यक्रम रद्द करावा लागला आणि विद्यार्थ्यांना सभागृहाबाहेर काढण्याची विनंती पोलिसांना करावी लागली.
>येत्या १२ मार्च रोजी पीएसआयची स्पर्धा परीक्षा असून, आगामी हंगाम हा स्पर्धा परीक्षांचाच आहे. त्यामुळे कार्यक्रमाला एवढी गर्दी होईल, असे वाटले नव्हते. कार्यक्रम विनामूल्य ठेवण्यात आला होता. नुकसानभरपाई संदर्भात व्यवस्थापकांशी चर्चा करू. - मानसिंग साबळे, आयोजक
>बालगंधर्वची आसनक्षमता एवढी नसतानाही विद्यार्थी इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रवेश नाकारल्यावर त्यांनी परिसरात तोडफोड केली. या संदर्भात आयोजकांकडून नुकसानभरपाई घेणार आहे.
- भारत कुमावत, व्यवस्थापक बालगंधर्व