सांस्कृतिक दहशतवादाचा कुटील डाव

By admin | Published: November 6, 2014 10:18 PM2014-11-06T22:18:07+5:302014-11-06T22:57:00+5:30

किशोर बेडकीहाळ : नरेंद्र दाभोलकरांच्या जयंतीनिमित्त विविध उपक्रम

Cultural terrorism | सांस्कृतिक दहशतवादाचा कुटील डाव

सांस्कृतिक दहशतवादाचा कुटील डाव

Next

सातारा : ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विकासाची भाषा बोलत आहेत. मात्र, त्याचवेळी जाणीवपूर्वक व आक्रमकपणे हिंदूत्वचे आव्हान करणारी मंडळे पुढे येत आहेत. हिंदुत्वाच्या या आव्हानाला सक्षमपणे तोंड देण्यासाठी परिवर्तनवादी चळवळींची पुनर्बांधणी व पुनर्मांडणी करणे गरजेचे आहे. देशात छुप्या मार्गाने सांस्कृतिक दहशतवाद आणण्याचा डाव या मंडळीकडून केला जात आहे,’ असा आरोप ज्येष्ठ विचारवंत किशोर बेडकिहाळ यांनी केला.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या ६९ व्या जयंतीनिमित्त सातारा येथील प्राध्यापक संघटनेच्या कार्यालयात आयोजित कार्यक्रमात बोलत होते. यावेळी विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे उपाध्यक्ष विजय मांडके, विमा कामगार संघटनेचे पश्चिम विभागाचे अध्यक्ष कॉ. वसंतराव नलावडे उपस्थित होते.
धर्म, इतिहास व सांस्कृतिक या तिन्ही क्षेत्रांत सुरू असलेल्या घडामोडी याची साक्ष देतात. सण, उत्सव यापासून अल्पसंख्याकांना वेगळे पाडणे चुकीचा इतिहास पुढे मांडण्याचा अधिकृतपणे प्रयत्न करणे, पुराण कथांना ऐतिहासिकतेचा दर्जा देणे, या सारख्या गोष्टी सध्या घडताना दिसत आहेत. हा योगायोग नाही. हिंदू धर्मानुसार अंत्यविधी करण्याच्या विविधपद्धती अस्त्विात असूनही बरेच लोक आज अंत्यविधीसाठी विद्युतदाहिनीचा आधार घेतात. अशा मंडळींना विद्युतदाहिनीचा वापर केल्याने धर्म बुडतो, असे वाटत नाही. केंद्रीय मंत्री उमा भारती मात्र, उघडपणे विद्युतदाहिनीच्या विरोधी सक्रियपणे आवाहन करताना दिसतात, हे कशाचे द्योतक आहे.
विजय मांडके यांनी आपल्या भाषणात सांगितले की, ‘डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या कार्याला सध्याचा वातावरण प्रतिकूल आहे. जादूटोणा प्रतिबंधक कायदा समंत झाला असला तरी कायद्याला उघड-उघड विरोध करणाऱ्या शक्ती आता केंद्रात व राज्यात सत्तेवर आल्यामुळे या कायद्याची अंमलबजावणी धोक्यात येऊ शकते.’
यावेळी कॉ. वसंतराव नलवडे, प्रा. आर. वाय. जाधव, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे उदय चव्हाण, यांचीही समयोचित भाषणे झाली.
अविनाश जगताप यांनी सूत्रसंचालन करून प्रास्ताविक केले. प्रा. एस. एस. पाटील, जयंत उथळे, मिनाज सय्यद, दिलीप ससाणे, गौतम भोसले, दत्ता राऊत, विजय निंबाळकर, विजय माने, श्रीनिवास जांभळे, दिनानाथ दाभोलकर, सागर गायकवाड आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
भाषा विकासाची... अजेंडा हिंदुत्वाचा!
‘देशात व राज्यात सत्तांतर झाल्यापासून राज्यकर्त्यांनी विकासाची भाषा बोलायची व संघ परिवारातील संघटनांनी हिंदुत्वाचा अजेंडा पुढे रेटायचा, अशी स्वच्छ विभागणी झालेली दिसते. ज्या पद्धतीने निवडणूक कालावधीत हिंदू विरुद्ध मुसलमान असे चित्र उभे केले. त्यानुसार हिंदुत्ववादी संघटना ही विभागणी टोकदारपणे पुढे नेहण्याचा प्रयत्न करीत आहेत,’ असेही बेडकिहाळ आपल्या भाषणात म्हणाले.

Web Title: Cultural terrorism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.