कुरकुंभची पाणी समस्या गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2017 01:28 AM2017-03-02T01:28:36+5:302017-03-02T01:28:36+5:30
महाराष्ट्र औद्योगिक क्षेत्राकडून मिळणाऱ्या पाण्यावरच अवलंबून असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.
कुरकुंभ : कुरकुंभ (ता. दौंड) येथील पाण्याची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत असताना कुरकुंभ ग्रामपंचायत याबाबत मात्र गंभीर नसून कुरकुंभ आजदेखील महाराष्ट्र औद्योगिक क्षेत्राकडून मिळणाऱ्या पाण्यावरच अवलंबून असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे पाण्याचा वापर वाढला असून, त्याचा पुरवठा करणे मात्र नियंत्रणाबाहेर जात असल्याचे दिसते. गावातील नागरिक पूर्णपणे फक्त याच एका पाणीपुरवठा योजनेवर अवलंबून असून, दुष्काळी परिस्थितीत ही समस्या मोठी होत आहे.
कुरकुंभला असणारा रासायनिक प्रकल्प हा इथल्या पाण्याच्या समस्येचे प्रमुख कारण आहे. कुरकुंभ व परिसरातील गावांना याचा प्रामुख्याने दुष्परिणाम भोगावा लागत असून, गेली २५ वर्षे यावर कुठल्याच प्रकारचा सकारात्मक कार्यक्रम राबविण्यात आलेला नाही. कुरकुंभला होणारा पाणीसाठा हा सध्या येथील महाराष्ट्र औद्योगिक मंडळाकडून होत आहे. तोदेखील त्यांना उपलब्ध असणाऱ्या पाणीसाठ्यावर अवलंबून आहे. त्यामुळे जर त्यांनी पाणी दिले, तरच कुरकुंभला पाणी मिळणार, अशी गंभीर स्थिती निर्माण झाली आहे व या रासायनिक प्रकल्पाचा परिणाम भोगत असणाऱ्या पांढरेवाडी या गावालादेखील अशीच काहीश्ी स्थिती पाहायला मिळते.
कुरकुंभ ओद्योगिक क्षेत्राला वरवंड येथील व्हिक्टोरिया तलावातून पाण्याचा पुरवठा केला जातो व त्याद्वारे कुरकुंभ व पांढरेवाडीलादेखील पुरवठा होतो. मात्र, उद्योगाला पाणी कमी पडण्यास सुरुवात झाली, की गावाचा पाणीपुरवठादेखील कमी केला जातो. त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात समस्या निर्माण होते. मागील वर्षीच्या दुष्काळात कुरकुंभच्या जनतेला अक्षरश: रासायनिक पाण्याचा वापर करावा लागला, तर पिण्याचे पाणीदेखील जवळपास तीन महिने विकत घ्यावे लागले. या सर्व प्रकारात सर्वसामान्य जनता भरडली जात असून त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे. दरम्यान, ज्या तलावातून पाणीसाठा उपलब्ध होत आहे, त्यातच राखीव साठा असणे गरजेचे आहे; अन्यथा मागील दुष्काळात ज्या गावांना पाणी नाही, त्यांना यातूनच पुरवठा केला गेल्यामुळे कुरकुंभला पाणी मिळणे कठीण झाले होते. (वार्ताहर)
>पाणी आहे; मात्र दूषित
कुरकुंभ गावात पाण्याचा साठा बहुतांश ठिकाणी उपलब्ध आहे; मात्र त्याचा उपयोग दैनंदिन गरजा भागविण्यासाठीदेखील करता येत नाही. गावात असणाऱ्या विहिरी, बोअरवेल व अन्य साधने मोठ्या प्रमाणात दूषित असून त्यामध्ये फेसाळलेले व उग्र वास असणारे पाणी आहे, जे हातात सुद्धा घेता येत नाही. त्यामुळे अत्यंत गंभीर परिस्थिती निर्माण होते. यामुळे मोठ्या प्रमाणात साठा करून ठेवण्याची गरज आहे. याबाबत कुठलीच योजना सध्या तरी दिसून येत नाही. त्यामुळे कुरकुंभला पाण्याचा राखीव साठा मिळणे अत्यंत आवश्यक आहे.