दही हंडी कायदेभंग करणाऱ्यांना होऊ शकते मामुली शिक्षा
By admin | Published: August 25, 2016 08:20 PM2016-08-25T20:20:50+5:302016-08-25T20:20:50+5:30
गुरुवारच्या दहिहंडी उत्सवात २० फुटांहून अधिक उंचीचे थर लावून आणि १८ वर्षांहून कमी वयाच्या मुलांना मानवी मनोऱ्यावर चढवून, ज्या आयोजकांनी व दहिहंडी मंडळांनी सर्वोच्च न्यायालायच्या
Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 25 - गुरुवारच्या दहिहंडी उत्सवात २० फुटांहून अधिक उंचीचे थर लावून आणि १८ वर्षांहून कमी वयाच्या मुलांना मानवी मनोऱ्यावर चढवून, ज्या आयोजकांनी व दहिहंडी मंडळांनी सर्वोच्च न्यायालायच्या आदेशाचा भंग केला त्यांना, जेव्हा केव्हा गुन्हा सिद्ध होईल तेव्हा, फार तर सहा महिन्यांची कैद अथवा/ आणि एक हजार रुपयांपर्यंत दंड अशी मामुली शिक्षा होऊ शकेल.
दहिहंडी मंडळांना परवानगी देताना पोलिसांनी त्यांना न्यायालयाच्या आदेशाची संपूर्ण कल्पना दिली होती व त्याचे पालन करण्याचे हमीपत्र त्यांच्याकडून घेतले होते. ज्यांनी याचे उल्लंघन केले त्यांच्याविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम १८८ अन्वये गुन्हे नोंदविण्यात येतील, असे पोलिसांतर्फे सांगण्यात आले.
एखाद्या सक्षम अधिकाऱ्याने एखादी गोष्ट करू नका असा आदेश देऊनही त्याचे पालन न करण्यासाठीच्या शिक्षेचे हे कलम आहे. हा गुन्हा सिद्ध होण्यासाठी केवळ आदेशाचे उल्लंघन पुरेसे नाही.त्यामुळे अडथळा, उपद्रव किंवा शारीरिक इजा प्रत्यक्ष होणे अथवा ते पोहचण्याची शक्यता निर्माण होणे अपेक्षित आहे. शारीरिक इजा होऊ शकेल, अशा उल्लंघनासाठी एक महिन्याची साधी कैद अथवा/ आणि २०० रुपये दंड होऊ शकेल. मानवी जीव धोक्यात येईल, असे उल्लंघन असेल तर सहा महिन्यांपर्यंत कैद व एक हजार रुपयांपर्यंत दंड होऊ शकेल.