जामोद येथे संचारबंदी चार तासांसाठी शिथिल
By admin | Published: April 19, 2016 02:36 AM2016-04-19T02:36:12+5:302016-04-19T02:36:12+5:30
जामोद येथे उसळलेल्या दंगलीनंतर लावण्यात आलेली संचारबंदी तब्बल ३६ तासानंतर सोमवारी चार तासांसाठी शिथिल करण्यात आली.
जामोद (जि. बुलडाणा): जामोद येथे उसळलेल्या दंगलीनंतर लावण्यात आलेली संचारबंदी तब्बल ३६ तासानंतर सोमवारी चार तासांसाठी शिथिल करण्यात आली. सकाळी १0 ते १२ व त्यानंतर दुपारी ४ ते ६ अशी पुन्हा दोन तासांच्या टप्प्यातील शिथिलतेनंतर पुन्हा संचारबंदी लावण्यात आली आहे. संचारबंदीदरम्यान कुठलीही अनुचित घटना घडली नसून, गावात तणावपूर्ण शांतता कायम आहे. संचारबंदी शिथिलतेच्या तासात ग्रामस्थांनी आपले दैनंदिन व्यवहार उरकले. जामोद येथे १६ एप्रिल रोजी रात्री ८ वाजताच्या दरम्यान जातीय तणाव निर्माण होऊन दगडफेक व जाळपोळीचे प्रकार घडले होते. यानंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबार केला होता; तसेच गावात संचारबंदी लागू करण्यात आली असून, सोमवारी चार तासांच्या शिथिलतेनंतर पुन्हा संचारबंदी कायम ठेवली आहे. सध्या गावातील तणाव ओसरत असून, शांततेचे वातावरण आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक संजयकुमार बाविस्कर हे परिस्थिती नियंत्रण ठेवण्यासाठी जामोद येथे तळ ठोकून आहेत, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी, ठाणेदार यांच्यासह २२५ पोलीस अधिकारी व कर्मचारी, राज्य राखीव पोलीस दल व केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे जवान बंदोबस्तासाठी तैनात आहेत. या दंगलप्रकरणी १११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून ८७ आरोपींना अटक केली आहे. यापैकी २७ जणांना पोलीस कोठडी तर ५२ जणांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून, या सर्वांची रवानगी बुलडाणा येथील कारागृहात करण्यात आली आहे, तर पोलिसांनी गावातील काही जणांच्या घरातून देशी कट्टा, तलवारी असे प्राणघातक साहित्यसुद्धा जप्त केले आहे.