वर्तमानात जगण्याचा राजमार्ग म्हणजे योग
By admin | Published: June 18, 2017 12:17 AM2017-06-18T00:17:25+5:302017-06-18T00:17:25+5:30
डॉ. सद्गुरूयोगीराज श्री श्री मंगेशदा हे सद्गुरू क्रि या योगा फाउंडेशनचे व्यवस्थापक. या फाउंडेशनच्या जगभरात ९३ शाखा आहेत. मंगेशदा
डॉ. सद्गुरूयोगीराज श्री श्री मंगेशदा हे सद्गुरू क्रि या योगा फाउंडेशनचे व्यवस्थापक. या फाउंडेशनच्या जगभरात
९३ शाखा आहेत. मंगेशदा यांनी भारताला एशियन कराटे चॅम्पियनशिप मिळवून दिली आहे. संगीत, नृत्य, क्रीडा या तिन्ही कलांमध्ये त्यांना नैपुण्य प्राप्त आहे. देशातील ज्येष्ठ योगतज्ज्ञांपैकी ते एक आहेत. गेली ५ दशके योगशास्त्राबाबत आणि क्रि यायोगाबाबत त्यांचे संशोधन सुरू आहे. तसेच जगभरात योगाचा प्रचार आणि प्रसार ते करीत आहेत. त्यांच्या या कार्यासाठी त्यांना अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. आयुष मिनिस्ट्री अॅण्ड कर्नाटक गव्हर्नमेंट अॅवॉर्ड, इंडो-व्हियतनाम अॅवॉर्ड, ग्रीन अॅम्बेसेडर अॅवॉर्ड, ज्वेल आॅफ इंडिया अॅवॉर्ड, एशिया पॉसिक इंटरनॅशनल अॅवॉर्ड असे अनेक पुरस्कार त्यांना प्राप्त झाले आहेत. २१ जून या ‘जागतिक योग दिना’चे औचित्य साधून त्यांच्याशी साधलेला हा दिलखुलास संवाद.
योग या शब्दाची नेमकी व्याख्या काय आहे?
ज्ञात आणि अज्ञात गोष्टींना जोडणारा दुवा म्हणजे योग. प्रत्येक व्यक्ती ही योग घेऊनच जन्माला आलेली असते. प्रत्येक मूल आईच्या गर्भाशयातच योग घेऊन आलेले असते. आपण सर्वच श्वास आणि उच्छ्वासाबरोबर योग घेऊनच जन्माला आलेलो आहोत.
योगाचा आणि मानवी मनाचा कसा संबंध आहे ?
माणसाचे मन हे हळवे असते आणि ते सतत भविष्यकाळात किंवा भूतकाळात रमते. परिणामी त्याच्यावरचा तणाव वाढतो, आजारपण वाढतात. योगाभ्यास तुम्हाला वर्तमानात जगायला शिकवतो. मुळात योग साधना ही अतिप्राचीन आहे. आणि आजच्या धकाधकीच्या जीवनात अतिशय महत्त्वाची गरज बनली आहे. श्वासावर नियंत्रण मिळवण्याची प्रक्रिया म्हणजे प्राणायाम. शरीराचा आणि श्वासाचा योग्य वापर करून मनावर मिळवलेले संपूर्ण नियंत्रण म्हणजेच योग.
प्राणायाम आणि ध्यानधारणा याच्या माध्यमातून ताण-तणाव कसा कमी करता येतो?
माझ्या अनेक वर्षांच्या संशोधनातून एक गोष्ट मी सिद्ध केली आहे की प्राणायामाच्या माध्यमातून शरीरातील दोष बाहेर काढता येतात. मन सुदृढ तर शरीर सुदृढ. शरीरातील श्वसनाचे प्रमाण असमान होण्यास कारण ताण-तणाव, दूषित वातावरण, अकार्यक्षम फुप्फुस, चुकीचा आहार इ. प्राणायमाद्वारे नाडीशुद्धी केल्यामुळे शरीरातील मज्जासंस्था कार्यक्षम बनते. ध्यानधारणेने मन शुद्ध आणि स्थिर होते. चयापचयाची क्रिया व्यवस्थित होते; त्याबरोबर शुद्धीच्या क्रिया संपूर्ण शरीराला निरोगी, निकोप ठेवतात.
कॅन्सर, मधुमेह, पॅरेलेसिस यांच्यावर आपण कित्येक वर्षे संशोधन केलेले आहे, योग साधनेच्या माध्यमातून अशा दुर्धर रोगांवर कसे नियंत्रण मिळवता येईल?
९५ टक्के आजार हे मानसिक स्तरावर होतात. योगामुळे इच्छाशक्ती वाढते. शरीरातले अवयव, पेशी आणि विचारांची तीव्रता उत्कृष्ट पद्धतीने वाढवली जाते. गेल्या कित्येक वर्षांत योगचिकित्सेने कॅन्सरसारख्या आजारावर योगाच्या माध्यमातून मात करून लोक आज सुदृढ आयुष्य जगत आहेत. योगातील वमन, बस्ती, नेती या क्रियांद्वारे शरीरातील अशुद्ध द्रव्य बाहेर काढले जाते. म्हणूनच वैद्यकीय उपचाराबरोबर योगचिकित्सा ही अतिशय परिणामकारक ठरलेली आहे. योग हा कमीतकमी वेळेत आणि अगदी अल्पशा मोबदल्यात करण्याचा उपाय आहे. ज्यामुळे माणसाला विविध समस्यांमधून कायमस्वरूपी मुक्ती मिळू शकते.
लवकरच तुम्ही योग साधनेतील सुवर्ण महोत्सवात प्रवेश करणार आहात तसेच तुम्हाला डॉक्टरेट ही पदवीसुद्धा बहाल करण्यात आली आहे, तर काय सांगाल तुमच्या ४९ वर्षांतील योगसाधनेच्या अनुभवांविषयी?
मी वयाच्या ६व्या वर्षी दहिसरमधल्या एक छोट्याशा गावातून माझ्या योगसाधनेला सुरुवात केली. मी लावलेल्या एका छोट्याशा रोपट्याचे आज वटवृक्षात रूपांतर झाले आहे. आमच्या सद्गुरू मंगशेदा क्रिया योगा फाउंडेशनच्या जगभरात आज ९३ शाखा आहेत. फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही अनेक समाजोपयोगी उपक्रम हाती घेतले. यातले सर्वांत मोठे यश आम्हाला नेत्रदानाच्या अभियानाला मिळाले. या अभियानांतर्गत सुमारे ४४ लाख लोकांनी नेत्रदानाची प्रतिज्ञा घेतली आहे. तसेच यातील काही लोकांनी आपले मरणोत्तर नेत्रदानही केले आहे. मी अंधश्रद्धा निर्मूलन मोहीम राबवली. स्वच्छता अभियान, लाखोंच्या संख्येने वृक्षारोपण, महिलांसाठी स्वसंरक्षणाचे धडे दिले. त्याचबरोबर संगीत, क्रीडा आणि कला या माध्यमातून योग आणि स्वास्थ्य यांचा सतत प्रचार सुरू आहे. वेगवेगळी व्यसनमुक्ती आंदोलनेही केली, जेलमधील कैद्यांना मी योगाचे प्रशिक्षण देतो आहे. आज मला अभिमान वाटतोय की या प्रवासात जगभरातून लाखोंच्या संख्येने विविध धर्माची माणसे या योगसाधनेत सामील झालेली आहेत. योग हा आध्यात्माकडे सहजपणे घेऊन जाण्याचा राजमार्ग आहे. तसेच या एकाच विषयाने संबंध देश एक होतोय आणि लवकरच प्रेम आणि शांती यांचाही योग जगभरात येईल.