दस्त नोंदणी महागणार
By admin | Published: January 1, 2015 02:16 AM2015-01-01T02:16:21+5:302015-01-01T02:16:21+5:30
राज्यात १ जानेवारीपासून (आजपासून) रेडी रेकनरच्या दरात २० टक्क्यांची वाढ होत आहे.
मुंबई / पुणे : राज्यात १ जानेवारीपासून (आजपासून) रेडी रेकनरच्या दरात २० टक्क्यांची वाढ होत आहे. परिणामी, गृहखरेदी, जमीन खरेदी आणि एकूणच मालमत्ता व्यवहारांत आवश्यक असलेली दस्त नोंदणी महागणार असल्याने या व्यवहारांची किमतही वाढणार आहे.
मुंबई मुद्रांक अधिनियमांतर्गत नोंदणी व मुद्रांक शुल्क विभाग दर वर्षी बाजारमूल्य दर तक्ते (रेडी रेकनर) चे दर निश्चित करतात. मुद्रांक विभागाने यंदा रेडी रेकनरच्या दरात सरासरी २० टक्के दर वाढ प्रस्तावित केली आहे. त्यामुळे एक जानेवारीपासून नागरिकांना वाढीव दराने दस्त नोंदणी करावी लागणार आहे.
एक जानेवारीपासून दरवाढ होत असल्याने डिसेंबरच्या महिन्यात दस्त नोंदणीसाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. बुधवारीही (३१ डिसेंबर रोजी) राज्यभरात एकाच वेळी नागरिकांनी दस्त नोंदणीसाठी सर्व दुय्यम निबंधक कार्यालयात गर्दी केली. ‘ग्रास’ हे संकेतस्थळ संपूर्ण महाराष्ट्रात बंद पडल्यामुळे अनेक दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदणी होऊ शकली नाही.