बिल्डरविरोधात ग्राहकांचा मोर्चा
By Admin | Published: January 16, 2017 02:56 AM2017-01-16T02:56:50+5:302017-01-16T02:56:50+5:30
बेकायदा इमारतीतील घरे ग्राहकांना विकणाऱ्या बिल्डरविरोधात रविवारी ग्राहकांनी कामोठे पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला
कळंबोली : बेकायदा इमारतीतील घरे ग्राहकांना विकणाऱ्या बिल्डरविरोधात रविवारी ग्राहकांनी कामोठे पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला आणि त्याच्याकडून पैसे परत मिळवून देण्याची मागणी केली. पोलिसांनी निवेदन स्वीकारून याबाबत कार्यवाही करण्याची ग्वाही दिली.
वसाहतीत सेक्टर-३ येथे राजवर्धन पाटील आणि संजय गोवारी यांनी श्रीहरी संकुल उभारले होते. यामध्ये अडीचशे चौरस फुटाचे वन आरके घर ग्राहकांना विक्र ी करण्यात आले होते. त्या बदल्यात त्यांच्याकडून पैसेही घेण्यात आले होते. परंतु हे बांधकाम नियमबाह्य तसेच अनधिकृत असल्याने २०१५ साली सिडकोने त्यावर हातोडा मारला. त्यामुळे बुकिंग केलेल्या ग्राहकांनी आपल्या पैशाची मागणी केली होती. त्यानुसार बिल्डरने सर्वांकडून मूळ पावत्या जमा करून त्यांना धनादेश दिले. परंतु बँकेत पैसे नाही, नंतर धनादेश टाका असे त्याच्याकडून वारंवार सांगण्यात आले. त्यानंतर तारीख बदलून पुन्हा चेक दिले, मात्र दोन वर्षे उलटली तरी ग्राहकांना त्यांचे पैसे परत मिळाले नाहीत. शेवटी रविवारी दीडशे जण आपल्या कुटुंबीयांसह कामोठे पोलीस ठाण्यात आले आणि त्यांनी आपले गाऱ्हाणे मांडले. आम्ही आयुष्याची पुंजी या घराकरिता खर्च केली आणि या बिल्डरांनी फसवणूक केली. आता घर घेण्याची कुवत राहिली नाही. त्याचबरोबर इच्छा नाही अशी संतप्त प्रतिक्रि या ग्राहकांनी दिली. संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी यावेळी उपस्थितांनी पोलिसांकडे केली. संतप्त झालेल्या महिलांनी बिल्डरने दिलेले धनादेश दाखवून राग व्यक्त केला. हा चेक बँकेत कधी वटणार, असा सवाल करीत आपल्या संतापाला वाट करून दिली.