ग्राहकांच्या बाउन्स चेकचा महावितरणला ‘शॉक’, दरमहा १० हजार धनादेश बाउन्स
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2018 05:39 AM2018-04-05T05:39:59+5:302018-04-05T05:39:59+5:30
वीजबिल भरण्यासाठी महावितरणने ग्राहकांना आॅनलाइन सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामुळे आर्थिक भुर्दंड व वीजपुरवठा खंडित होण्याची कारवाई व गैरसोय टाळण्यासाठी, लघूदाब वीजग्राहकांनी धनादेशाऐवजी महावितरणच्या वेबसाइट किंवा मोबाइल अॅपद्वारे वीजबिलाचा
मुंबई - वीजबिल भरण्यासाठी महावितरणने ग्राहकांना आॅनलाइन सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामुळे आर्थिक भुर्दंड व वीजपुरवठा खंडित होण्याची कारवाई व गैरसोय टाळण्यासाठी, लघूदाब वीजग्राहकांनी धनादेशाऐवजी महावितरणच्या वेबसाइट किंवा मोबाइल अॅपद्वारे वीजबिलाचा आॅनलाइन भरणा करावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.
धनादेशाद्वारे वीजबिलाचा भरणा केल्यास, कोणत्याही कारणामुळे धनादेश बाउंस होण्याची शक्यता असते. सद्यस्थितीत महावितरणचे दरमहा सुमारे ७ लाख ग्राहक वीजबिलाचा भरणा धनादेशाद्वारे करीत आहेत. त्यापैकी साधारणत: १० हजार धनादेश दरमहा बाउंस होतात. त्यामुळे ग्राहकांना ३५० रुपये दंड, धनादेश अंतिम मुदतीच्या तारखेनंतर वटल्यास, पुढील बिलात लागून येणारी थकबाकी यासह सदर ग्राहकाची पुढील सहा महिने धनादेशाद्वारे वीजबिल भरण्याची सुविधा स्थगित केली जाते, तसेच धनादेश बाउंस
होणे हा दखलपात्र फौजदारी गुन्हा आहे.
रिझर्व्ह बँकेच्या नियमांप्रमाणे, धनादेश वटण्यास साधारणत: तीन ते चार दिवसांचा कालावधी लागतो. धनादेश वटल्यानंतरच बिलाची रक्कम प्राप्त झाल्याची नोंद ग्राहकांच्या खात्यावर होते. अनेक ग्राहक अंतिम मुदतीच्या एक-दोन दिवस अगोदर धनादेशाद्वारे वीजबिलाची रक्कम भरतात. त्यामुळे मुदतीनंतर वीजबिलाचा भरणा झाल्यास, संबंधित ग्राहकांना धनादेशाद्वारे भरलेली रक्कम थकबाकी म्हणून पुढील बिलात लागून येते किंवा कोणत्याही कारणाने धनादेश बाउन्स झाला, तर आर्थिक दंडासह वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई केली जाते.
काही ठिकाणी एखादी व्यक्ती १५ ते २० वीजग्राहकांच्या वीजबिलांची रक्कम रोख स्वरूपात घेऊन ती धनादेशाद्वारे भरते. यात धनादेश बाउन्स झाल्यास त्याचा वीजग्राहकांना नाहक आर्थिक फटका बसू शकतो व त्यांचा वीजपुरवठाही खंडित होऊ शकतो.
त्रासापासून वाचण्यासाठी व घरबसल्या वीजबिल भरण्यासाठी महावितरणची वेबसाइट व मोबाइल अॅपची सोय उपलब्ध आहे. इंटरनेट व मोबाइल अॅपच्या माध्यमातून सद्यस्थितीत सुमारे ३५ लाख वीजग्राहक सुमारे ६०० कोटी रुपयांचा दरमहा वीजबिल भरणा करीत आहेत. त्यामुळे धनादेशाऐवजी वीजग्राहकांनी या सुविधांचा लाभ घ्यावा.
भांडुप परिमंडळाची मार्च २०१८ ची आकडेवारी
ठाणे विभाग
एकूण धनादेश - ८६,१४३
रक्कम - ६२ कोटी ३० लाख
बाउन्स धनादेश - १,४४१
रक्कम - १ कोटी ३५ लाख
वाशी विभाग
एकूण धनादेश - ६८,२३५
रक्कम - ४८ कोटी ९३ लाख
बाउन्स धनादेश - ८८५
रक्कम - ७ लाख ६९ हजार