एपीएमसीमध्ये शेतकऱ्यांसह ग्राहकांची लूट
By admin | Published: May 19, 2016 03:07 AM2016-05-19T03:07:55+5:302016-05-19T03:07:55+5:30
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फळ मार्केटमध्ये शेतकऱ्यांसह ग्राहकांची लूट सुरू आहे.
नामदेव मोरे,
नवी मुंबई- मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फळ मार्केटमध्ये शेतकऱ्यांसह ग्राहकांची लूट सुरू आहे. फळे घेवून येणारे शेतकरी व खरेदी करण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांकडून मापाडी कामगारांकडून पैसे वसूल केले जात आहेत. खुलेआम सुरू असलेल्या वसुलीकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्यामुळे या वसुलीमध्ये वरिष्ठांचाही वाटा असल्याचा संशय घेतला जात आहे.
आशिया खंडातील सर्वात मोठी बाजार समिती असा नावलौकिक असणाऱ्या मुंबई बाजार समितीमध्ये नियम धाब्यावर बसवून कामकाज सुरू आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून शेतकरी या ठिकाणी कृषी माल विक्रीसाठी पाठवितात. मार्केटमध्ये आलेल्या कृषी मालाचे वजन करून त्यांची नोंद ठेवण्यासाठी मापाडी कामगारांची नियुक्ती केली आहे. परंतु फळ मार्केटमध्ये मापाडी कामगार तोलाईचे मूळ काम न करता जावक गेटवर ठाण मांडून बसत आहेत. मार्केटमध्ये फळांची खरेदी करून जाणाऱ्या ग्राहकांकडून बेकायदेशीरपणे पैसे वसूल केले जात आहेत. पाटीवाले व हातगाडी चालकांनाही दहा रुपये दिल्याशिवाय मार्केटमधून बाहेर जाता येत नाही. प्रत्येक वाहन चालकाला मापाडींचा अनधिकृत टोल भरावाच लागत आहे. वास्तविक त्यांना गेटवर नियुक्ती कोणी व का दिली हा प्रश्न बाजार समितीमधील कर्मचाऱ्यांनी अनेक वेळा उपस्थित केला आहे. परंतु वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्याची दखल कधीच घेतली नाही.
ग्राहकांनी खरेदी केलेला माल व भरलेली बाजार फी बरोबर आहे का याची तपासणी करण्याची जबाबदारी एपीएमसीचे निरीक्षक व लेखनिकांची आहे. परंतु हे काम मापाडी कामगारांनी स्वत:कडे घेतले आहे. मालाची तपासणी होतच नाही, पण तत्काळ बाहेर सोडण्यासाठी वसुली बिनधास्तपणे सुरू आहे. वर्षानुवर्षे हा प्रकार सुरू असूनही त्याकडे कोणीच लक्ष देत नसल्याने ग्राहकांनीही तीव्र नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे.
मापाडी कामगारांच्या मनमानीवर कोणाचेही नियंत्रण राहिलेले नाही. आंबा हंगाम सुरू असल्याने किरकोळ व्यापाऱ्यांबरोबर सामान्य ग्राहकही मार्केटमध्ये खरेदीसाठी येतात. सामान्य ग्राहक रीतसरपणे बाजारफी भरतात. परंतु अनेकजण बाजार फी बुडवून कारमधून आंबे घेवून जात आहेत. सामान्य ग्राहकांना अडविणारे मापाडी कर बुडविणाऱ्यांवर मात्र काहीच कारवाई करत नाहीत. कारमधून आंबे घेवून जाणाऱ्यांना सोडण्याच्या सूचना अधिकाऱ्यांनी दिल्या असल्याचे सांगितले जात आहे. मार्केटमधील व्यापारी आंबे किंवा इतर फळे घेवून गेले तर त्यांच्याकडून बाजार फी न घेण्याच्या सूचना असल्याचे सांगितले जात आहे.
वास्तविक बाजारसमिती कायद्यामध्ये मार्केटमधून कर न देता माल घेवून जाण्याची सूट कोणालाही दिलेली नाही. परंतु मापाडी कामगार अधिकाऱ्यांचे नाव सांगून कायद्याचे उल्लंघन करत आहेत. जर कोणी आक्षेप घेतल्यास त्यांना उद्धट भाषेत उत्तरे दिली असून काहीजण दमदाटीही करत आहेत. बिनधास्तपणे बेकायदेशीर वसुली करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
>सुरक्षारक्षकही...
फळ मार्केटमध्ये सुरू असलेल्या वसुलीला सुरक्षारक्षकही पाठीशी घालत आहेत. उपलब्ध छायाचित्र व चित्रीकरणामध्ये सुरक्षारक्षकही पैसे घेत असल्याचे दिसत आहे. पाच ते दहा रुपये घेतले जात आहेत. ही रक्कम अत्यंत कमी असली तरी त्यामुळे बाजार समितीची प्रतिमा मलीन होत आहे.
>सहकारमंत्र्यांकडे तक्रार
फळ मार्केटमध्ये मापाडी कामगार ग्राहकांकडून अनधिकृतपणे पैसे वसूल करत आहेत. पैसे दिल्याशिवाय हातगाडी चालक, पाटीवाले व वाहनधारकांना बाहेर जाता येत नाही. कामगार पैसे घेत असतानाचे छायाचित्रण दक्ष नागरिकांनी केले आहे. गेटवर काही व्यक्ती ग्राहकांकडून पैसे घेत असल्याची छायाचित्रेही उपलब्ध झाली आहेत. या संदर्भात सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे तक्रार करणार आहे.