कडधान्येही येणार ग्राहकांच्या दारी : सदाभाऊ खोत
By admin | Published: May 2, 2017 04:58 AM2017-05-02T04:58:50+5:302017-05-02T04:58:50+5:30
ज्या पद्धतीने शासनाने शेतकऱ्यांच्या हितासाठी भाजीपाला नियमनमुक्ती केली आहे आणि शेतमाल थेट ग्राहकांच्या दारी
ठाणे : ज्या पद्धतीने शासनाने शेतकऱ्यांच्या हितासाठी भाजीपाला नियमनमुक्ती केली आहे आणि शेतमाल थेट ग्राहकांच्या दारी नेण्याचे धोरण सुरू केले, त्याच धर्तीवर कडधान्य नियमनमुक्तीचा निर्णय घेतला जाणार असल्याचे सूतोवाच कृषी व पणनमंत्री सदाभाऊ खोत यांनी केले. या संदर्भात तत्काळ मुख्यमंत्र्यांना पत्र देण्यात येणार असून, शेतकऱ्यांचे कडधान्य थेट ग्राहकापर्यंत पोहोचविण्यासाठी पावले उचलली जातील, असे आश्वासनही त्यांनी दिले.
ठाण्यातील गावदेवी मैदानात संस्कार आणि कोकण विकास प्रतिष्ठान, तसेच नाम फाउंडेशन यांनी आयोजित केलेल्या आंबा आणि धान्य महोत्सवाचा शुभारंभ खोत यांच्या हस्ते करण्यात आला, त्या वेळी ते पत्रकारांशी बोलत होते.
शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी, यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी सांगितले. ज्या शेतकऱ्यांची तूर २२ एप्रिलपर्यंत केंद्रावर पोचली असेल, अशांचे पंचनामे करण्याचे आदेश प्रांत आणि जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. त्या सर्वांची तूर विकत घेतली जाईल, या आश्वासनाचा त्यांनी पुनरुच्चार केला.
काही ठिकाणी व्यापाऱ्यांची तूर शेतकऱ्यांच्या नावे विकण्याचे प्रकार घडले आहेत, असे प्रकार गेल्या काही दिवसात वाढतच चालले आहेत. त्यामुळे अशा प्रकारांची माहिती घेतली जाणार आहे. शिवाय अशाप्रकारे घोटाळा करणाऱ्या व्यापाऱ्यांवर तातडीने गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
प्रत्येक जिल्ह्यात कृषी महोत्सव
ठाण्यात ज्या पद्धतीने प्रथमच धान्य महोत्सव भरविण्यात आला आहे, त्याच धर्तीवर राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात कृषी महोत्सव भरविण्याचा निर्णय घेण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. शेतकरी आता पिकवायला आणि विकायला देखील शिकला आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता नाम फाऊंडेशन सारख्या संस्थांच्या माध्यमातून आपले धान्य थेट ग्राहकापर्यंत पोहचवावे, असे आवाहन त्यांनी केले.
गारपीटग्रस्तांना भरपाई
राज्यातील ज्या भागांत गारपीट झाली आहे आणि त्यामुळे जे काही नुकसान झाले असेल, त्या ठिकाणचे पंचनामे २४ तासांत करण्याचे आदेश देण्यात आले असून, तेथील शेतकऱ्यांना नुकसानभरपाई दिली जाईल, असेही खोत यांनी स्पष्ट केले.
कर्जमाफी मिळावी : अनासपुरे
शेतकऱ्याला पाच लाखांपर्यंतची कर्जमाफी मिळालीच पाहिजे, अशी मागणी नाम फाउंडेशनचे प्रमुख, अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी केली, तसेच स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी झालीच पाहिजे, या मागणीचा पुनरुच्चार केला. शेतकऱ्यांची तूर केंद्रावर पडून आहे, त्यांना पैसे मिळण्यास एक ते दीड महिन्यांचा कालावधी जाणार आहे. तरीही या शेतकऱ्यांना बँकांनी नोटीस बजावली आहे. अशा शेतकऱ्यांचे व्याज माफ झाले पाहिजे, असे ते म्हणाले. शेतकऱ्यांचे धान्य थेट ग्राहकापर्यंत पोहोचविण्याचा हा पहिला प्रयत्न आहे, तो यशस्वी झाल्यास राज्यात सर्वत्र तो राबवला जाईल, असे ते म्हणाले.
केंद्रांवर तूर घेतली जात नसताना दुसरीकडे बँकांकडून मात्र, या शेतकऱ्यांना व्याज भरण्यासाठी नोटिसा बजावल्या जात असल्याच्या प्रश्नावर खोत यांना छेडले असता, त्यांनी सांगितले की, जो शेतकरी अडचणीत असेल, दुष्काळग्रस्त असेल, पाण्याचा प्रश्न त्याला सतावत असेल, अशांसाठी कर्जाचे पुनर्गठण करण्याचे आदेश दिले जातील, असे खोत यांनी सांगितले.