रूढी-परंपरांना तिलांजली
By admin | Published: April 4, 2015 04:34 AM2015-04-04T04:34:43+5:302015-04-04T04:34:43+5:30
आधुनिक व पुढारलेल्या समाजाने स्त्री-पुरुष समानतेच्या कितीही बाजारगप्पा मारल्या तरीही बुरसटलेल्या रूढी-परंपरांचे ओझे अजूनही पुरोगामी महाराष्ट्राच्या खांद्यावर आहे
उमेश जाधव, टिटवाळा
आधुनिक व पुढारलेल्या समाजाने स्त्री-पुरुष समानतेच्या कितीही बाजारगप्पा मारल्या तरीही बुरसटलेल्या रूढी-परंपरांचे ओझे अजूनही पुरोगामी महाराष्ट्राच्या खांद्यावर आहे. मात्र, टिटवाळा येथील कल्पिता माधवी ही तरुणी याला अपवाद ठरली. वडिलांना मुखाग्नी (मूठमाती) देऊन एक वेगळाच विचार तिने समाजाला देऊ केला आहे.
टिटवाळा येथील गायत्री धाम सोसायटी, सेक्टर १मध्ये माधवी कुटुंब राहते. मूळचे जुन्नरचे आसणारे हे कुटुंब गेल्या चार पिढ्यांपासून खर्डीला वास्तव्यास आले. सुरेश माधवी हे १२ वर्षांपासून टिटवाळ्यात राहत होते. त्यांचे २ एप्रिल रोजी मूत्रपिंडाच्या दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्यामागे त्यांची पत्नी आणि एक मुलगी कल्पिता एवढेच कुटुंब. अंत्यविधी करताना मुलानेच वडिलांना मुखाग्नी द्यायचा असतो. मुलगा नसेल तर संबंधित नात्यातील पुरुषाने. मात्र, सुरेश यांना २३वर्षीय कल्पिताने मुखाग्नी देण्याची इच्छा प्रकट केली. तेव्हा अंत्यविधीसाठी जमलेल्या लोकांच्या कपाळावर आठ्या उमटल्या. मात्र, तिने फक्त आपल्या आईची परवानगी घेऊन रूढी-परंपरेला मूठमाती दिली. स्मशानभूमीत सर्व विधी स्वत: कल्पिताने केले. वडिलांना मुखाग्नी दिला. खंबीर मुलाप्रमाणेच आईलाही धीर दिला.