१५० कोटींच्या खरेदीत १५ कोटींचे सीमाशुल्क बुडविले
By admin | Published: August 6, 2014 01:10 AM2014-08-06T01:10:12+5:302014-08-06T01:10:12+5:30
बेंबळा धरणाच्या डेहणी उपसा सिंचन प्रकल्पाच्या १५० कोटींच्या साहित्य खरेदीत तब्बल १५ कोटी रुपयांचा उत्पादन व सीमाशुल्क बुडविण्यात आल्याचे पुढे आले आहे. तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांची दिशाभूल
डेहणी उपसा सिंचन : अभियंता, कंत्राटदाराकडून जिल्हाधिकाऱ्यांची केली दिशाभूल
सतीश येटरे - यवतमाळ
बेंबळा धरणाच्या डेहणी उपसा सिंचन प्रकल्पाच्या १५० कोटींच्या साहित्य खरेदीत तब्बल १५ कोटी रुपयांचा उत्पादन व सीमाशुल्क बुडविण्यात आल्याचे पुढे आले आहे. तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांची दिशाभूल करून पाटबंधारे विभागाच्या अभियंत्यांनी आणि कंत्राटदाराने संगनमताने हा प्रकार केल्याची माहिती आहे.
डेहणी उपसा सिंचन प्रकल्प उभारताना पहिल्या टप्प्यात (फेज -१) बेंबळा धरणातून पाणी उचलणे व ते शेतापर्यंत पोहोचविणे यासाठी पाईपलाईन आणि पंप बसविण्यात आले. ही यंत्रणा उभी करताना वॉल्व्ह, लोखंडी पाईप, पीव्हीसी पाईप, मोटरपंंप, ३३ केव्ही लाईन, व्हीटी पंप, व्हीसीबी, सीआरपी, साटी केबल, गर्डर, एसीएसआर कंडक्टर, सॉफ्ट स्टार्टर, ३३ केव्ही इन्सूलेटर सेंट्रीफिगल पंप आदी १५० कोटी रुपयांच्या ६४ प्रकारच्या साहित्याची खरेदी करण्यात आली. खरेदी करताना एकूण रकमेच्या सुमारे १०.२ टक्के असे १४ कोटी ५० लाख रुपये असा केंद्रीय उत्पादन व सीमा शुल्क विभागाकडे कराचा (अबकारी) भरणा करणे अपेक्षित होते. परराज्यातून हे साहित्य आयात केल्याने त्यावर सीमाशुल्क आकारण्यात येते. बेंबळाचे उपकार्यकारी अभियंता अनिल सोनेवार यांनी कंत्राटदार कंपनीच्या प्रतिनिधींशी संगनमत करून पर्याय शोधला. सीमाशुल्क माफ करण्यात यावे, यासाठी बेंबळा प्रकल्पाचे तत्कालीन कार्यकारी अभियंता किरण हातगावकर यांच्याकडे तो सादर केला. त्यांनीही हा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे दिला. जिल्हाधिकाऱ्यांची दिशाभूल करीत या प्रस्तावाला ३ जुलै २००७ ला मंजुरात मिळवून अबकारी कर माफ करून घेतला. ही बाब केव्हातरी उघडकीस येईल, हे संबंधित अभियंत्यांना ठाऊक होते. त्यांनी कंत्राटदार कंपनीकडून केवळ १०० रुपयांच्या स्टॅम्पवर हमीपत्र लिहून घेतले. त्यामध्ये भविष्यात सीमाशुल्क कराचा भरणा करण्याचे आदेश झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी ‘आयव्हीआरसीएल’ या कंत्राटदार कंपनीची असेल, असे नमूद करण्यात आले. या संदर्भात येथील बेंबळा प्रकल्प कार्यालयाकडे काही तक्रारी प्राप्त झाल्या. त्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या गंभीर प्रकाराची बारकाईने चौकशी व्हावी, अशी मागणीही आता जोर धरू लागली आहे. यासंदर्भात बेंबळा प्रकल्प कार्यालयाचे तत्कालीन कार्यकारी अभियंता किरण हातगावकर यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.