साहित्य संमेलनासाठी दिल्लीचा पत्ता कट, नाशिकची पाहणी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2021 06:04 AM2021-01-04T06:04:41+5:302021-01-04T06:05:02+5:30
sahitya sammelan संमेलनस्थळासाठी ही समिती फक्त नाशिकलाच भेट देणार असल्याने दिल्लीचा पत्ता कट झाल्याचे स्पष्ट आहे. मात्र, याबाबत साहित्य महामंडळाने अधिकृतपणे सांगण्यास नकार दिला.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद/नाशिक/पुणे : ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्लीत नव्हे, तर नाशिकलाच होणार याचे आता स्पष्ट संकेत मिळाले आहेत. साहित्य संमेलनाचे स्थळ निश्चित करण्यासाठी मराठवाडा साहित्य परिषदेत रविवारी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाची बैठक झाली. या बैठकीत स्थळ निवड समिती नेमण्यात आली. ही समिती नाशिक येथे ७ जानेवारीला स्थळ निवडीसाठी भेट देईल आणि त्यानंतर ८ जानेवारीला या समितीची बैठक औरंगाबादेत होईल, असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.
संमेलनस्थळासाठी ही समिती फक्त नाशिकलाच भेट देणार असल्याने दिल्लीचा पत्ता कट झाल्याचे स्पष्ट आहे. मात्र, याबाबत साहित्य महामंडळाने अधिकृतपणे सांगण्यास नकार दिला. ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनाबाबत सार्वजनिक वाचनालय संस्था व लोकहितवादी मंडळ या नाशिक येथील दोन संस्था आणि दिल्ली येथील सरहद संस्था यांच्या निमंत्रणाचे प्रस्ताव साहित्य महामंडळाकडे आले होते. यापैकी पहिल्यापासूनच नाशिकचे पारडे जड होते. त्यामुळे सरहद संस्थेने पुन्हा एकदा प्रस्तावाबाबतचे स्मरणपत्र साहित्य महामंडळाला धाडले होते.
स्थळ निवड समिती ७ जानेवारी रोजी नाशिक येथे भेट देणार असून, ८ जानेवारी रोजी या समितीची बैठक औरंगाबादेत होणार आहे. या बैठकीत साहित्य संमेलन कोठे व्हावे, याची शिफारस महामंडळास ही समिती करेल, असे सांगण्यात आले.
साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील, कार्यवाह डॉ. दादा गोरे, कोषाध्यक्ष डॉ. रामचंद्र काळुंखे, प्रा. प्रतिभा सराफ, प्रदीप दाते, प्रकाश पायगुडे यांचा या निवड समितीत समावेश आहे.
...अन्यथा संमेलनच रद्द?
संमेलन नाशिकलाच घ्यायचे आणि ते शक्य नसल्यास संमेलनच रद्द करायचे, अशी भूमिका महामंडळाच्या अध्यक्षांनी घेतल्याची चर्चा आहे. संमेलनस्थळ आधीच ठरवले असेल तर मग निवड समितीचे सोपस्कार कशासाठी, असा सवाल साहित्य वर्तुळातून उपस्थित केला जात आहे. दरम्यान, महाराष्ट्र साहित्य परिषद आणि मुंबई मराठी साहित्य संघाने दिल्लीला पाठिंबा दिल्याचे बोलले जात आहे.
मायमराठीसाठी मन मोठं करावं
या संमेलनाच्या निमित्ताने पुन्हा एकदा मराठीचा आवाज दिल्लीत बुलंद व्हायला हवा. नाशिकमध्ये साहित्य संमेलन घेऊन शरद पवार यांना भेट द्यायची आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ आणि हेमंत टकले म्हणत आहेत. त्यांनी आपले मन मोठे करायला हवे. दिल्लीत संमेलन झाले, तर पवारसाहेबांचाही दिल्लीत मान वाढणार आहे. - संजय नहार, संस्थापक, सरहद
संमेलन यशस्वी करण्याचा नाशिककरांचा निर्धार
नाशिक : साहित्य संमेलन नाशिकला मिळाल्यास ते यशस्वी करण्याचा निर्धार लोकहितवादी मंडळाने केला आहे. तयारीसाठी केवळ दोन महिन्यांचाच कालावधी मिळणार आहे. आयोजनाचा प्रस्ताव लोकहितवादी मंडळाने दिला असला, तरी हे संमेलन नाशिककरांचे असेल, असे लोकहितवादी मंडळाचे अध्यक्ष जयप्रकाश जातेगावकर यांनी सांगितले.