दारुच्या नशेत सपासप वार करुन मित्राचा काढला काटा
By Admin | Published: August 10, 2016 12:43 PM2016-08-10T12:43:28+5:302016-08-10T12:46:20+5:30
दारुच्या तरर्र नशेत दत्ता मधुकर कदम (२८ रा. बंकटगल्ली, अंबाजोगाई) या तरुणाची मित्रानेच चाकूने सपासप वार करुन हत्या केली.
ऑलाइन लोकमत
बीड, दि. १० - दारुच्या तरर्र नशेत दत्ता मधुकर कदम (२८ रा. बंकटगल्ली, अंबाजोगाई) या तरुणाची मित्रानेच चाकूने सपासप वार करुन हत्या केली. ही खळबळजनक घटना अंबाजोगाई येथे मंगळवारी रात्री १० वाजता घडली.
पोलिसांच्या माहितीनुसार, मयत दत्ता कदम व आरोपी राहुल विष्णू शिंंदे हे दोघे बंकटगल्ली येथे राहत. बांधकामावर मजूर म्हणून काम करणाºया या दोघांत मैत्रीचे नाते होते; पंरतु तीन महिन्यांपूर्वी दत्ताच्या दुचाकीचा धक्का जया शिंदे यांना लागला होता. त्यानंतर जया शिंदे व बालू गोरे यांनी दत्ताच्या घरी येऊन त्याला सुनावले होते.
दरम्यान, मंगळवारी रात्री राहुल शिंदे याने दत्ताला आपल्या घरी नेले. तेथे जुन्या भांडणावरुन दत्ताच्या पोटावर चाकूने सपासप वार केले. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी मयत दत्ताची आई शालू कदम हिच्या फिर्यादीवरुन शहर ठाण्यात राहुल शिंदेविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंद केला. आरोपी अटक असून तपास सहायक निरीक्षक एस. सी. होगले करत आहेत.
भरल्या ताटावरुन नेले
मयत दत्ता मंगळवारी रात्री साडेआठ वाजता आपल्या घरी जेवण करत होता. यावेळी राहुल शिंदे घरी आला. त्याने दत्ताला बाहेर चल... असे म्हटले. यावेळी शालू कदम यांनी जेवण करुन जा.. असे म्हटले; परंतु दत्ता राहुलसोबत भरल्या ताटावरुन उठून गेला. त्यानंतर तो घरी परतलाच नाही. कुटुुंबियांना त्याचा मृतदेहच पहावयास मिळाला.