राम कदम यांची जीभ छाटा, आणि पाच लाख रुपये मिळवा, माजी मंत्र्याचे चिथावणीखोर वक्तव्य
By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2018 05:17 PM2018-09-06T17:17:55+5:302018-09-06T17:18:02+5:30
भाजपा आमदार राम कदम यांनी दहीहंडीवेळी मुलींबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यावरून सुरू झालेला वाद थांबण्याचे नाव घेत नाहीये.
बुलडाणा - भाजपा आमदार राम कदम यांनी दहीहंडीवेळी मुलींबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यावरून सुरू झालेला वाद थांबण्याचे नाव घेत नाहीये. एकीकडे या विधानाबाबत राम कदम यांनी माफी मागितली असली तरी त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी होत आहे. दरम्यान, माजी मंत्री सुबोध सावजी यांनी राम कदम यांच्या विरोधात चिथावणीखोर वक्तव्य करताना राम कदम यांची जीभ छाटा आणि पाच लाख रुपये बक्षीस मिळवा, असे विधान केले आहे. त्यामुळे एका नव्या वादास सुरुवात झाली आहे.
राम कदम यांची जीभ छाटा आणि पाच लाख रुपये बक्षीस मिळवा, असे विधान सावजी यांनी केल्याचे वृत्त मराठी वृत्तवाहिनी एबीपी माझाने प्रसारित केले आहे. भाजप आमदार राम कदम यांनी घाटकोपर येथील दहीहंडी कार्यक्रमात मुलींना पळवून आणू, असे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यामुळे राज्यभरातून त्यांच्याविरुद्ध तीव्र प्रतिक्रिया येऊ लागल्या. राज्यातील अनेक ठिकाणी महिला संघटनांकडून त्यांचा निषेध नोंदविण्यात आला. तसेच त्यांच्या पोस्टरला चपलांचा मार देण्यात आला. तर विरोधकांनीही या प्रकरणावरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केले. मुख्यमंत्र्यांनीही महाराष्ट्रातील जनतेची माफी मागावी, अशी मागणी करण्यात येत होती. त्यानंतर आज आमदार राम कदम यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन माफीनामा जाहीर केला होता.