कालव्यात सांडपाणी सोडण्याचा कट उधळला
By Admin | Published: May 18, 2016 03:37 AM2016-05-18T03:37:39+5:302016-05-18T03:37:39+5:30
गृहनिर्माण संकुलातील सांडपाणी चोरटया पध्दतीने लगत असलेल्या कालव्यात सोडण्याचा कट शाखा अभियंता सूर्या प्रकल्प यांनी ग्रामस्थांच्या मदतीने उधळून लावला.
निखील मेस्त्री,
पालघर/नंडोरे- अंबाडी ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या सत्यम लाईफस्टाईल या गृहनिर्माण संकुलातील सांडपाणी चोरटया पध्दतीने लगत असलेल्या कालव्यात सोडण्याचा कट शाखा अभियंता सूर्या प्रकल्प यांनी ग्रामस्थांच्या मदतीने उधळून लावला.
या ग्रामपंचायतीमध्ये सत्यम लाईफस्टाईल ही विकासक कंपनी मोठया प्रमाणावर गृहनिर्माण संकुल उभारत आहे. या संकुलांच्या आवारात साचणारे पाणी सोडण्याची व्यवस्था असूनही ते कोणतीही पूर्वपरवानगी न घेता सूर्या प्रकल्पांतर्गत असलेल्या कालव्याला मोठे भगदाड पडून संकुलातून पाईप टाकून त्याव्दारे ते पाणी कालव्यात सोडण्याचा संबंधित विकासकाचा डाव होता.
कालव्याच्या निरीक्षणासाठी या परिसरातून जात असलेले शाखा अभियंता प्रकाश संखे यांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी या विकासकाला खडसावले व कालव्याला पाडलेले भगदाड त्वरीत बंद करायला लावले. निरीक्षणासाठी आलेल्या शाखा अभियंता व ग्रामस्थांनी मिळून ही कारवाई केली.
या विकासकावर केलेली ही कारवाई योग्य असून त्याने पाणी सोडण्यासाठी रितसर जलसंपदा विभागाची परवानगी घ्यायला हवी होती. तसेच हा कालवा शासनाच्या अधिपत्याखाली येत असून पुढे असे कोणी विनापरवानगी व अनधिकृतरित्या कालव्याचे नुकसान केल्यास त्याच्या विरूध्द कठोर शासन करेल असे शाखा अभियंता प्रकाश संखे यांनी लोकमतशी बोलतांना सांगितले.