पुन्हा सायबर हल्ला ! भारतालाही फटका, JNPTतील कामकाज ठप्प

By admin | Published: June 28, 2017 08:27 AM2017-06-28T08:27:11+5:302017-06-28T09:31:58+5:30

युरोप आणि भारतात पुन्हा सायबर हल्ला झालेला आहे

Cyber ​​attack again! India shocked, JNPT functioning jam | पुन्हा सायबर हल्ला ! भारतालाही फटका, JNPTतील कामकाज ठप्प

पुन्हा सायबर हल्ला ! भारतालाही फटका, JNPTतील कामकाज ठप्प

Next

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 28 - जगभरातील देशांना पुन्हा एकदा सायबर हल्ल्याचा फटका बसला आहे. वान्नाक्राय या रॅन्समवेअर व्हायरसनं गेल्या महिन्याभरात माजवलेल्या दहशतीनंतर आता  पेट्या रॅन्समवेअर व्हायरसने जगभरातील देशांना टार्गेट केले आहे. यात भारत आणि युरोपचाही समावेश आहे. मंगळवारी युके, रशिया, फ्रान्स, स्पेनमध्ये या व्हायरसनं ग्राहक, मालवाहतूक, हवाई वाहतूक सेवा, तेल कंपन्यांवर हल्ला केला. भारताला या हल्ल्याची झळ बसली आहे,  यात जेएनपीटीवर हल्ला करण्यात आला आहे. यामुळे सध्या येथील कामकाज थांबवण्यात आल्याचे वृत्त आहे.  

हा व्हायरस "पीटा" नावाच्या जुन्या रॅन्समवेअरचं अॅडव्हान्स्ड वर्जन असल्याचे म्हटले जात आहे. पेट्यानं 20 प्रसिद्ध कंपन्यांमधील कम्प्युटर हॅक केले आणि कम्प्युटर अनलॉक करण्याच्या मोबदल्यात हॅकर्संनी 300 डॉलरची मागणी केली होती.  

यात युके आणि रशियातील ऑईल अँड गॅस, ऊर्जा आणि हवाई वाहतूक सेवेतील संबंधिक भारतीय सहाय्यक कंपन्यांनाही टार्गेट करण्यात आले आहे.  रॅन्समवेअरसारख्या हल्ल्यांच्या माध्यमातून पैसा मिळवण्याचा मार्ग सोपा असल्याने आता आधुनिक तंत्रज्ञानाला हल्लेखोर आपले शस्त्र बनवून अशापद्धतीनं त्याचा गैरवापर करत आहेत. 

युक्रेनमध्ये संकट 
रेन्समवेअर हल्ल्याचे गंभीर नुकसान युक्रेनला सोसावे लागत आहेत. येथील सरकारी मंत्रालयं, वीज कंपन्या आणि बँकातील कम्प्युटरमध्ये दोष आढळून येत आहेत. युक्रेनमधील सेंट्रल बँक, सरकारी वीज वितरक कंपनी युक्रेनेर्गो, विमान कंपन्या आणि काही पोस्टल सेवांवरदेखील या हल्ल्याचा परिणाम झाला आहे. तर दुसरीकडे या सायबर हल्ल्यामुळे काही पेट्रोल स्टेशनवरील कामकाज थांबवण्यात आल्याचीही माहिती समोर आली आहे.  
 
"रॅन्समवेअर" म्हणजे नेमकं काय ?
एखाद्या दिवशी तुम्ही तुमचा संगणक किंवा लॅपटॉप सुरू करायला जाता आणि त्यावर एक मेसेज तुम्हाला दिसतो कि, तुमचा संगणक किंवा लॅपटॉप आम्ही हॅक केलेले असून तुमचा संपूर्ण डेटा तुम्हाला हवा असल्यास स्क्रीनवर दिसत असलेल्या पेमेंट ऑप्शनला क्लिक करून अमुक इतकी रक्कम या बँक खात्यात पुढील अमुक इतक्या तासात जर ही रक्कम जमा झाली नाही तर तुमचा सर्व डेटा डिलीट होईल. तुमच्या स्क्रीनवर एका बाजूला तुम्हाला दिलेल्या वेळेचे काऊंटडाऊन सुद्धा चालू झालेले असते.
 
अर्थात तुमच्या संगणक किंवा लॅपटॉपचा संपूर्ण ताबा या हॅकर्सने घेतलेला असतो. या मेसेजपुढे तुमचा संगणक किंवा लॅपटॉप जातच नाही अर्थात तुमची ऑपरेटींग सिस्टम सुरू होत नाही. अशा प्रकारच्या सायबर गुन्हेगारीला रॅन्समवेअर असे म्हणतात. यात कुणीतरी सायबर गुन्हेगार अज्ञात ठिकाणाहून तुमचा संगणक किंवा लॅपटॉप हॅक करतो आणि तुम्हाला खंडणीची मागणी करतो. असे प्रकार जगात अनेक ठिकाणी उघडकीस आलेले आहेत. जगाच्या कुठल्या तरी कानाकोपर्‍यात बसून तुमचा डेटा नष्ट करण्याचे उद्योग हे ‘सायबर भामटे’ करायला लागले.
 
काय काळजी घ्यावी ?
१. सगळ्यात आधी तर तुमच्या संगणक किंवा लॅपटॉप मध्ये चांगला अ‍ॅन्टीव्हायरस असणे तसेच अ‍ॅन्टीव्हायरस नियमित अपडेट असणे आवश्यक आहे.
२.इंटरनेट वापरताना नेहमी सुरक्षित वेबसाईटलाच भेट द्या. कुठल्याही मोफत भूलथापांना बळी पडून चुकीच्या वेबसाईटला किंवा अनोळखी लिंकला क्लिक करू नका .
३. संगणक किंवा लॅपटॉपची ऑपरेटींग सिस्टमही नेहमी अपडेट असावी कारण अपडेटमध्ये बऱ्याच वेळा काही समस्यांवर उपाय उपलब्ध असते . जसे कि "रॅन्समवेअर" साठी पॅच मायक्रोसॉफ्ट ने दोन महिन्यापूर्वीच जारी केला होता .
 
४. तुमच्या संगणक किंवा लॅपटॉपचा नियमित डेटा कॉपी करून दुसऱ्या हार्ड डिस्कवर ठेवावा म्हणजे तुमचा संगणक हॅक झाला आणि तुमच्या डेटाच्या बदल्यात हॅकर ने तुम्हाला पैसे मागीतले तरी तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही .
 
स्मार्टफोनलाही धोका
संगणकांप्रमाणे स्मार्टफोन ला ही हॅकिंगचा धोका वाढल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. अनेक वेळा तुमच्या स्मार्टफोन वर काही जाहिराती दाखवल्या जातात त्यातील काही जाहिराती या हॅकरने तुम्हाला भुलवण्यासाठीसुद्धा टाकल्या असू शकतात. त्यामुळे अशा जाहिरातीला क्लिक करू नये तसेच एखादे अॅप तुमच्या स्मार्टफोन वर इन्स्टाल करण्यापूर्वी ते सुरक्षित आहे की नाही हे पाहून घ्या . शक्यतो गुगल प्ले वरून अॅप इन्स्टाल करा . कुठलीही एपीके फ़ाइल घेऊन तुमच्या स्मार्टफोन वर इन्स्टॉल करू नका . 
 
एक वर्षांपूर्वी "लोकमत"ने दिला होता इशारा
सोमवार ६ जून २०१६ च्या अंकात लोकमतने ने "रॅन्समवेअर" या व्हायरसच्या संभाव्य धोक्याविषयी आपल्या वाचकांना इशारा दिला होता . तसेच "रॅन्समवेअर" ह्या व्हायरसचा प्रतिकार करण्यासाठी काय काळजी घ्यावी याविषयी सविस्तर माहिती दिली होती . "रॅन्समवेअर" च्या संभाव्य हल्ल्याचे भाकीत देखील लोकमतने केले होते .

Web Title: Cyber ​​attack again! India shocked, JNPT functioning jam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.