चक्रीवादळ तामिळनाडूत, पाऊस बरसणार महाराष्ट्रात; तापमानदेखील घसरणार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2022 06:37 AM2022-12-10T06:37:52+5:302022-12-10T08:34:50+5:30

खबरदारीचा उपाय म्हणून एनडीआरएफच्या सहा तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.

Cyclone in Tamil Nadu; It will rain in Maharashtra; The temperature will also drop | चक्रीवादळ तामिळनाडूत, पाऊस बरसणार महाराष्ट्रात; तापमानदेखील घसरणार

चक्रीवादळ तामिळनाडूत, पाऊस बरसणार महाराष्ट्रात; तापमानदेखील घसरणार

Next

मुंबई/चेन्नई : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या मॅन-दौंस चक्रीवादळाचा महाराष्ट्रावरही परिणाम होणार असून, त्यामुळे ११ ते १३ डिसेंबरदरम्यान बीड, उस्मानाबाद, लातूर, नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. चक्रीवादळाच्या शक्यतेमुळे तामिळनाडूतील १३ जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

खबरदारीचा उपाय म्हणून एनडीआरएफच्या सहा तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. पुढील ३ ते ४ दिवस काही ठिकाणी आकाश अंशत: ढगाळ राहील. काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे, अशी माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाचे अतिरिक्त महासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी दिली. 

रात्री थंडी, दिवसा ऊब 
महाराष्ट्रात मुंबईसह कोकण वगळता उर्वरित महाराष्ट्रात किमान तापमानात साधारण ४, तर कमाल तापमानात २ अंशांनी सरासरीपेक्षा घसरण होऊन रात्री थंडी, दिवसा उबदारपणा जाणवत आहे. कोकणात मात्र दोन्ही तापमानांत सरासरीपेक्षा २ अंशांनी ही घसरण जाणवेल. रविवारी ढगाळ वातावरण राहील. सोमवारनंतर दोन्ही तापमानांत वाढ होईल. चेन्नईला मुसळधार पावसाचा तडाखा बसणार असल्याची शक्यता आहे.

चक्रीवादळ शनिवारी पहाटे तामिळनाडूच्या महाबलीपुरम किनारपट्टीवर आदळण्याची शक्यता आहे. त्यानंतर त्याचे हवेच्या अतितीव्र दाबात तर संध्याकाळी सहा वाजेपर्यंत त्याचे हवेच्या तीव्र दाबात रूपांतर होईल़.  - माणिकराव खुळे, निवृत्त हवामानतज्ज्ञ

वाहने मोकळ्या जागेत करा पार्क
लोकांना त्यांच्या गाड्या झाडांखाली न ठेवता मोकळ्या जागेत पार्क करण्याच्या सूचना करण्यात आल्या असून, सर्व उद्याने आणि क्रीडांगणे बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच लोकांना दोन दिवस समुद्रकिनाऱ्यावर न जाण्यास सांगण्यात आले आहे. पुद्दुचेरी आणि कराईकलमधील सर्व शाळा आणि महाविद्यालये शुक्रवारी बंद ठेवण्यात आल्या.

समुद्रकिनाऱ्यावरील सर्व दुकाने बंद
चक्रीवादळाच्या इशाऱ्यामुळे समुद्रकिनाऱ्यालगतची सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली होती, तर सुरक्षेसाठी मासेमारीच्या नौका समुद्रकिनाऱ्यापासून दूर ठेवण्यात आल्या होत्या. रुग्णवाहिकाही तैनात करण्यात आल्या. चक्रीवादळ सहा तासांत १३ कि.मी. वेगाने जवळजवळ पश्चिम-वायव्य दिशेने सरकले, त्यानंतर ते तीव्र झाले.

या जिल्ह्यांना इशारा
तामिळनाडूतील तिरुवल्लूर, चेन्नई, चेंगलपट्टू व कांचीपुरम जिल्ह्यांत काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. राणीपेट्टाई, वेल्लोर, तिरुपत्तूर, कृष्णगिरी, धर्मपुरी, तिरुवन्नमलाई, कल्लाकुरीची, अरियालूर, तिरूचिरापल्ली, करूर, इरोड, सेलम येथे हलका ते मध्यम पाऊस होईल.

Web Title: Cyclone in Tamil Nadu; It will rain in Maharashtra; The temperature will also drop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rainपाऊस