Cyclone Nisarga: केंद्रीय पथक करणार नुकसानीची पाहणी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2020 02:22 AM2020-06-14T02:22:39+5:302020-06-14T06:49:00+5:30
१५ ते १८ जून असा असणार कोकण दौरा
अलिबाग : निसर्ग चक्रीवादळाने कोकणामध्ये हानी झाली आहे. कोकणातील जनतेला आर्थिक मदतीचा हात मिळावा, यासाठी केंद्र सरकारने पाच हजार कोटी रुपयांची आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी केली जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर नेमकी वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी केंद्रीय पथक १५ ते १८ जून या कालावधीत कोकण दौऱ्यावर येत आहे.
केंद्र सरकारने नेमलेल्या या पथकाचे प्रमुख रमेश कुमार गांटा (आयएएस) हे आहेत. त्याचबरोबर त्यांच्या पथकामध्ये बी.के. कौल (संचालक, अर्थमंत्रालय, नवी दिल्ली), एन.आर.एल.के. प्रसाद (संचालक, ऊर्जा मंत्रालय, नवी दिल्ली), एस.एस. मोदी (उपसचिव, ग्रामीण विकास, मंत्रालय, नवी दिल्ली), आर.पी. सिंग (संचालक, कृषी मंत्रालय, नागपूर) आणि अंशुमाली श्रीवास्तव (मुख्य अभियंता, रस्ते वाहतूक, महामार्ग, मुंबई) यांचा समावेश आहे. केंद्रीय पथकाचे १५ जून रोजी मुंबईत आगमन होणार आहे. त्यानंतर १६ जून रोजी सकाळी सव्वानऊ वाजता भाऊचा धक्का येथून रो-रो सेवेने रायगड मांडवा जेट्टीकडे प्रयाण करणार आहे. मांडवा जेट्टी येथे सकाळी १० वाजता पथक दाखल होणार आहे. अलिबाग-चौल, मुरूड, श्रीवर्धनचा दौरा ते करणार आहेत. त्यानंतर १७ जूनला महाडहून रत्नागिरीकडे प्रयाण करून दिवसभर तेथील नुकसानीची पाहणी करणार आहेत. १८ जून रोजी दापोलीहून सकाळी लवकर निघून ते मांडवा जेट्टी येथून रो-रो सेवेने मुंबईला रवाना होणार आहेत.
कोकणला आणि कोकणी माणसाला पुन्हा उभे करायचे असेल तर केंद्राकडून मोठ्या प्रमाणात मदत होणे गरजेचे आहे. केंद्रीय पथक याची पाहणी करून त्याचा अहवाल केंद्र सरकाला सादर करणार आहे. त्यानंतरच केंद्राकडून राज्याच्या झोळीत किती हजार कोटी रुपयांची मदत पडणार हे स्पष्ट होईल.