Cyclone Nisarga : 'निसर्ग' चक्रीवादळामुळे महाराष्ट्र आणि गुजरातच्या किनारपट्टीजवळील जिल्ह्यांत 'धोक्याचा इशारा'
By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2020 08:11 PM2020-06-02T20:11:38+5:302020-06-02T20:14:29+5:30
महाराष्ट्रात ३ जून काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता
पुणे : अरबी समुद्रात निर्माण झालेले निसर्ग चक्रीवादळाचे रुपांतर तीव्र चक्रीवादळात होणार असून, ते बुधवारी दुपारनंतर पश्चिम किनारपट्टीवर हरिहरेश्वर आणि दमण दरम्यान धडकण्याची शक्यता आहे. यामुळे महाराष्ट्र आणि गुजरातच्या किनारपट्टीलगतच्या जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, रायगड, धुळे, नंदूरबार, नाशिक जिल्हा; तसेच दक्षिण मध्य महाराष्ट्रात ३ जून रोजी काही ठिकाणी अतिवृष्टी (२२० मिमीहून अधिक) होण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. तसेच, सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाची इशारा देण्यात आला आहे.
निसर्ग चक्रीवादळ मंगळवारी दुपारी अडीच वाजता पणजीपासून २९० किमी, मुंबईपासून ३८० किमी आणि सुरतपासून ६०० किमी अंतरावर होते. ते गेल्या ६ तासांमध्ये ताशी १३ किमी वेगाने किनार्याच्या दिशने पुढे सरकत आहे. मंगळवारी रात्री त्याचे रुपांतर तीव्र चक्रीवादळात होणार असून, ते पश्चिम किनारपट्टीला धडकेल, त्यावेळी वार्याचा वेग १०० ते ११० किमी इतका असण्याची शक्यता आहे. किनार्यावर धडकल्यानंतर त्याचा वेग कमी होण्याची शक्यता आहे. या चक्रीवादळाचा परिणाम गुरुवारी दुपारपर्यंत राहण्याची
शक्यता आहे.
कोकण, गोव्यात येत्या २४ तासांत सर्वत्र मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. ३ जून रोजी कर्नाटक किनारपट्टी, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल. दक्षिण गुजरातमधील वलसाड, नवसारी, डांग, दमण, दादरा आणि नगर हवेली व सुरत जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता आहे. हे चक्रीवादळ किनारपट्टीला धडकल्यानंतर त्याचा परिणाम जमिनीवर अगदी धुळे, नंदुरबार, पश्चिम मध्य प्रदेशापर्यंत जाणविणार आहे. महाराष्ट्र, गोव्याच्या किनारपट्टीवर ताशी ६० किमी वेगाने वारे वाहतील, चक्रीवादळ किनारपट्टीला धडकण्याच्या वेळी या वार्यांचा वेग ११० किमीपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. या काळात समुद्रात भरतीच्या वेळी १ ते २ मीटर इंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने
व्यक्त केला आहे. राज्यात मंगळवारी सकाळी संपलेल्या २४ तासांत कराड ४४, आजरा ४२, कोल्हापूर ३२, उस्मानाबाद २०, दाभोलीम १४, पणजी १३.६, औरंगाबाद १०, रत्नागिरी ८.३, जळगाव, सोलापूर ३.२ मिमी पावसाची नोंद झाली होती.
इशारा
३ जून रोजी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, धुळे, नंदूरबार, नाशिक, पुणे जिल्ह्यात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा इशारा देण्यात आला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, औरंगाबाद, जळगाव, सातारा, कोल्हापूर, जालना, अहमदनगर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातील घाट क्षेत्रात मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. ४ जून रोजी कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार तर उत्तर मध्य
महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.